नाशिक : गत पंधरवड्यापासून थंडीचा कडाका वाढू लागल्याने गरमागरम पदार्थांवर ताव मारण्यासाठी शहर परिसर अन् ग्रामीण भागातील हॉटेलांमध्ये खवय्यांची गर्दी वाढली आहे. सूप, चायनीज, पराठे, मसाला चहा, मसाला दूध, व्हेज-नॉनव्हेज पदार्थांना विशेष पसंती मिळत आहे.
सध्या नाशिकचे तापमान १० डिग्रीच्या खाली घसरल्याने थंडीत वाढ झाली आहे. थंडीचा आनंद घेण्यासाठी रात्रीच्या जेवणासाठी हॉटेलिंग करण्यास अनेकांकडून सहकुटुंब बेत आखले जातात. त्यातून सायंकाळपासून हॉटेलमधील टेबल बुक होऊ लागले आहेत. परिणामी, ऐन वेळी नियोजन केलेल्यांना प्रतीक्षा करावी लागत असल्याचे दिसून येते. शहरातील मोठ्या हॉटेल्ससह गरमागरम मासे, चिकन, मटण खाण्यासाठी महामार्गावरील ढाब्यांना पसंती दिली जाते. 'वीकएन्ड'ला तर मोठी गर्दी वाढते, यामुळे हॉटेलचालकही सध्या खूश आहेत. तर, सकाळच्या प्रहरी नाशिककरांच्या आवडत्या गरमागरम मिसळलाही मोठी मागणी वाढली आहे. प्रसिद्ध मिसळ सेंटरवर खवय्यांची मांदियाळी पाहायला मिळते.
मुंबईनाका ते पाथर्डी दरम्यानच्या, महामार्गालगत मोठ्या प्रमाणावर हॉटेल, ढाब्यांची संख्या वाढली आहे. गरमागरम व्हेज-नॉनव्हेज पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी नाशिककर याठिकाणी येत असतात. व्हेजमध्ये सध्या चायनीज स्टार्टरपासून पावभाजी, ग्रील्ड स्टार्टर, व्रॅप्स, पिझ्झा, बर्गर, कोम्बोज, पनीरच्या भाज्यांपासून चनामसाला, सोयबीन, मशरूम, व्हेज हराभरा कबाब आदी, तर नॉनव्हेजमध्ये चिकन, मटण, मासे आदी पदार्थांना पसंती देण्यात येत आहे.