नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयात शीतल मोरे या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हलगर्जीपणामुळे मोरे यांचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवत परिचारिकेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र ज्या व्यक्तीने तक्रारी केल्या, त्या व्यक्तीवर खंडणी, सरकारी कामात अडथळा आणणे असे गुन्हे दाखल झाल्याने परिचारिका संघटना आक्रमक झाली आहे. खोट्या आरोपांवरून चौकशी समितीने अहवाल करीत निलंबनाची केलेली कारवाई चुकीची असल्याचा आरोप नाशिक जिल्हा नर्सेस असोसिएशनने केला आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत रुग्णांच्या नातलगांना हाताशी धरून किंवा स्वत: नातलग असल्याचा दावा करीत संशयित राहुल खुर्चेसह डॉ. आनंद पवार, समाजसेवक म्हणून वावरणारा रवि पगारे व मुख्य प्रशासकीय अधिकारी व्ही. डी. पाटील यांनी डॉ. प्रतीक भांगरे यांच्याकडे १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्याचप्रमाणे रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीलेश पाटील यांच्या फिर्यादीनुसार, चौघांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौघांविरोधात दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर परिचारिका संघटना आक्रमक झाली असून, चौघांपैकी एकाने केलेल्या आरोपानुसार चौकशी समिती नेमून परिचारिकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
प्रत्यक्षात तक्रारदाराने केलेल्या आरोपानुसार शीतल माेरे यांच्या शवविच्छेदन अहवालात कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही. तरीदेखील अधिपरिचारिकेवर एकतर्फी कारवाई झाल्याचे संघटनेने म्हटले आहे. यासंदर्भात संघटनेच्या अध्यक्ष पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली परिचारिकांनी आरोग्य उपसंचालक डॉ. कपिल आहेर यांना निवेदन देत परिचारिकांवर केलेल्या निलंबनाची कारवाई मागे घेण्याची मागणी केली आहे. तसेच निलंबन मागे न घेतल्यास संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला. खंडणीखोरांच्या तक्रारीवरून निलंबन करण्याची कारवाई बंद करा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
याप्रसंगी संघटनेच्या अध्यक्षा पूजा पवार, सरचिटणीस कल्पना पवार, विशाल सोनार, वैशाली पराते, छाया नेरकर, ज्योती वाघ, के. डी. पवार, आशा गोंधळी आदी पदाधिकारी व परिचारिका उपस्थित होत्या.
एकच व्यक्ती वारंवार तक्रारी करत असते. रुग्णांच्या नातलगांची कोणतीही तक्रार नसताना ही व्यक्ती डॉक्टर, कर्मचाऱ्यांविरोधात तक्रारी करते. आंदोलन करून दबाव टाकत असल्याने परिचारिकांवर कारवाई होते. रुग्णांच्या नातलगांची तक्रार असल्यास त्याची आम्ही गांभीर्याने दखल घेऊ. मात्र संबंध नसलेल्या व्यक्तींच्या तक्रारी असल्यास त्या दखलपात्र नसून, त्यांच्या दबावातून प्रशासनाने कोणतीही कारवाई करू नये.पूजा पवार, अध्यक्ष, परिचारिका संघटना.