नाशिक : सिन्नर विधानसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेले राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांचा सर्वपक्षीय मित्रमंडळींच्या वतीने शनिवारी (दि.1) सकाळी दहा वाजता कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा हॉल येथे जाहीर नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नागरी सत्कार समितीचे ॲड. जयंत जायभावे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नाशिक शहर तसेच जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या चार दशकांपासून ॲड. कोकाटे कार्यरत आहेत. कोकाटे यांना राज्याचे कृषिमंत्रीपद मिळाले. हा आनंद साजरा करण्यासाठी विविध पक्षांमधील कोकाटे यांच्या मित्रपरिवाराने या नागरी सत्काराचे आयोजन केले असल्याचे ॲड. जायभावे यांनी सांगितले आहे.
कोकाटे हे सिन्नर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले असले तरी नाशिक शहराशीही त्यांची तितकीच जवळीक आहे. त्यामुळे केवळ राजकीय क्षेत्रातच नव्हे तर शहरातील विविध संस्था, संघटना व त्यांच्या पदाधिकाऱ्यांशीही कोकाटे यांचे जवळचे संबंध आहेत. म्हणून या सत्कार सोहळ्यात विविध पक्ष संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाल्याचे जायभावे यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमात कोकाटे यांना मानपत्रही प्रदान केले जाईल. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांच्याबद्दल व्यक्त केलेल्या भावनांची ध्वनिचित्र फीतही दाखविली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सत्कार समिती सदस्य अजय बोरस्ते, प्रकाश बनकर, शरद आहेर, अनिल चौघुले, लक्ष्मण सावजी, निवृत्ती अरिंगळे, देवानंद बिरारी, यशवंत सिंग, सुनील भायभंग आदी उपस्थित होते.