नाशिक : महापौर भाजपचाच होणार हे स्पष्ट झाल्यानंतर आता महापौरपदासाठी फिल्डिंग लावण्यासाठी कुंभमेळामंत्री तथा भाजपचे निवडणूक प्रभारी गिरीश महाजन यांच्याभोवती इच्छुकांची गर्दी वाढली आहे. महापौरपदाबरोबरच उपमहापौर आणि स्थायी समिती सभापतिपदासाठीही इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, पदवितरणात भौगोलिक समतोल साधण्याची भूमिका भाजपने घेतली आहे.
नाशिक महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. भाजपने सर्वाधिक 72 जागांवर विजय मिळवित महापालिकेची सत्ता सलग दुसऱ्यांदा एकहाती काबीज करण्याचा इतिहास घडविला. महापालिकेत महापौरपदाच्या रूपाने सत्ता स्थापनेची तयारी भाजपने सुरू केली आहे. नाशिकचे महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने नाशिकमध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याची धुरा महिला महापौरांच्या हाती असणार हे आता स्पष्ट झाले आहे.
महापौरपदासाठी स्थायी समितीच्या पहिल्या महिला सभापती म्हणून पद भूषविलेल्या हिमगौरी आहेर, दीपाली गिते, स्वाती भामरे, डॉ. दीपाली कुलकर्णी यांच्यासह डॉ. योगिता हिरे, चंद्रकला धुमाळ यांची नावे चर्चेत आहेत. महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत असल्यामुळे महापौरपदाची निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे. महापौर निवडीच्या विशेष महासभेतच उपमहापौरपदाच्या नियुक्तीची घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे उपमहापौरपदासाठीही इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. महापौरपद महिलांसाठी राखीव झाल्यामुळे उपमहापौरपद पुरुष नगरसेवकाला मिळावे, अशी मागणी पुढे येत आहे. अर्थात महापालिकेत महापौर, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त महिला असल्यामुळे उपमहापौरपदही महिलेलाच मिळणार, असाही एक मतप्रवाह आहे. उपमहापौरपदासह महापालिकेची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या सभापतिपदासाठीदेखील भाजपमध्ये मोठी रस्सीखेच सुरू आहे. या सत्तापदांच्या वाटपात भाजपकडून भौगोलिक समतोल राखला जाईल, अशी माहिती पक्षांतर्गत सूत्रांनी दिली आहे.
गटनेतेपदासाठीही मोर्चेबांधणी
महापालिकेत सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपचे गटनेतेपदही वजनदार असणार आहे. त्यामुळे या पदासाठीदेखील इच्छुकांनी मोर्चेबांधणी केली आहे. मंगळवारी पक्षाची गटनोंदणी होण्याची शक्यता असून, त्यात गटनेतेपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. उबाठात गटनेते पदासाठी महानगरप्रमुख प्रथमेश गिते व केशव पोरजे यांची नावे आघाडीवर आहेत. तीन नगरसेवक निवडून आणणारे सुफी जीन यांना काँग्रेसचे गटनेते पद मिळण्याची शक्यता आहे. एकमेव नगरसेवक असलेल्या मनसेलादेखील गटनेते पद मिळणार आहे. अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे यांनी स्वतंत्र नोंदणी केल्यास त्यांनाही गटनेतेपद मिळेल.
बोरस्ते पुन्हा विरोधी पक्षनेते
केंद्र व राज्यात भाजपबरोबर सत्तेत असलेल्या शिवसेनेला (शिंदे गट) दुसऱ्या क्रमांकाच्या 26 जागा मिळाल्यामुळे विरोधी पक्षनेतेपदावर समाधान मानावे लागणार आहे. शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांना पुन्हा एकदा विरोधी पक्षनेतेपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. बोरस्ते यांच्याशिवाय प्रवीण तिदमे यांचेही नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी चर्चेत आहे.