नाशिक : पुढारी वृत्तसेवा
इराण व अमेरिकेमधील युद्धामुळे आखाती देशातील विविध भागांत गेलेले चारशेवर नागरिक अडकून पडले आहेत. दिवसेंदिवस ही संख्या वाढतच आहे. मात्र आकडा वाढत असला तरी अडकलेल्या नागरिकांची आवश्यक ती पुरेशी माहिती मिळत नसल्याने प्रशासनालाही अडचणी येत आहेत.
पहिल्या दिवशी अडकलेल्या नागरिकांची संख्या ३२ होती. त्यात १२ विद्यार्थी आहेत. तर मालेगाव येथून रमजाननिमित्त मक्केला गेलेल्या भाविकांची संख्या ७०० बोलली जात आहे. मात्र प्रशासनाकडे खऱ्या अर्थाने आतापर्यंत ३९२ नागरिकांची माहिती प्राप्त झाली आहे.
त्यातही १० जण गुरुवारी सुखरूप नाशिकमध्ये परतले आहेत. प्रशासनाने अडकलेल्या नागरिकांना योग्य ती मदत उपलब्ध व्हावी किंवा महाराष्ट्रात येण्यासाठी मदत मिळावी म्हणून प्रशासन गुगल फॉर्मद्वारे आवश्यक ती माहिती मागवित आहे.
मात्र मालेगाव येथील ७०० भाविकांचा आकडा चर्चेत असताना सद्यस्थितीत ३८२ जणांची संपूर्ण माहितीची नोंद आहे. तर काहींची अपूर्ण माहिती प्राप्त झाली आहे. असा एकूण आकडा चारशेवर आहे. अडकलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांनी तत्काळ गुगल फॉर्म भरून प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बाळकृष्ण देशपांडे यांनी केले.
नाशिकचे बोडके-धात्रक कुटुंब स्वगृही
नाशिक शहरातील दोन कुटुंबातील दहा जण सुखरूप स्वगृही परतले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार ज्याप्रमाणे महाराष्ट्रात आल्यावर भीतीचे सावट दिसत आहे. प्रत्यक्षात दुबईमध्ये तसे काहीही नाही. केवळ अफवांमुळे वातावरण गंभीर केले जात असल्याचे मत संपत बोडके यांनी व्यक्त केले.
शहरातील संपत बोडके व दीपक धात्रक हे आपल्या कुटुंबासह २७फेब्रुवारीला आखाती देशात पर्यटनासाठी गेले होते. ते एकूण १० जण होते. पहिल्या दिवशी तेथे गेल्यावर नातेवाइकांचे फोन आले. त्यामुळे पहिल्या दिवशी आम्ही फिरू शकलो नाही. बुर्ज खलिफा इमारतीमध्ये १२५ व्या मजल्यावर आमची खोली होती.
नेमके त्याचा बाजूला हल्ला झाल्याचे फोन नातेवाइकांचे आले. मात्र आम्हाला तेथे तसे कळले नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही तेथील अनेक पर्यटनस्थळांना भेटी देऊन पर्यटनाचा आनंद लुटला. प्रत्यक्षात तेथे कोणतेही भीतीचे सावट नाही. केवळ महाराष्ट्रात वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पर्यटकांच्या नातेवाइकांमध्ये अधिक भीती पसरली होती. गुरुवारी सायंकाळी सुखरूप नाशिकमध्ये पोहोचलो.