नाशिक : नाशिक महानगरपालिका निवडणूक २०२५ ची आदर्श आचारसंहिता, नाताळ सण व ३१ डिसेंबर नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्यविक्री व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कडक कारवाई सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून २५ डिसेंबर २०२५ रोजी नाशिक शहरात मुंबई- आग्रा महामार्गावर सिडको परिसरात मोठी कारवाई करण्यात आली असून सुमारे १९ लाख ७३ हजार रुपयांचा अवैध देशी-विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी रुतिकभाई गणेशभाई थलपती यास अटक करण्यात आली आहे.
अधीक्षक संतोष झगडे, उपअधीक्षक अ.सु. तांबारे, उप-अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, 'ब' विभाग, नाशिक यांच्या पथकाने ही कारवाई केली. स्प्लेण्डर हॉलसमोर, मुंबई–आग्रा महामार्गावर लेखानगर, सिडको येथे अवैधरित्या मद्य वाहतूक करणारी किआ कंपनीची चारचाकी कार (जी.जे.१५ सी.क्यु.१६१२) अडवून तपासणी करण्यात आली.
तपासणीत केवळ दादरा-नगर हवेली, दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशात विक्रीसाठी असलेली रॉयल चॅलेंज, रॉयल स्टॅग, मॅकडॉवेल नं.१, रॉयल स्पेशल, लॉर्ड जॉन व्हिस्की तसेच बडवायझर मॅग्नम व कार्ल्सबर्ग बिअर असा मोठा साठा आढळून आला. विविध क्षमतेच्या एकूण हजारो सिलबंद बाटल्या व बिअर टिन्स असा हा मद्यसाठा जप्त करण्यात आला.
अवैध मद्यनिर्मिती, विक्री किंवा वाहतुकीबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९, व्हॉट्सॲप क्रमांक ८४२२००११३३ किंवा दूरध्वनी क्रमांक ०२५३-२५८१०३३ वर संपर्क साधावासंतोष झगडे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क
या प्रकरणी रुतिकभाई गणेशभाई थलपती (वय २४, रा. कुंता, ता. पार्डी, जि. वलसाड, गुजरात) याला अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई निरीक्षक आर. जे. पाटील, एन. एच. गोसावी, तसेच उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली असून पुढील तपास निरीक्षक आर. जे. पाटील करीत आहेत.