सटाणा (नाशिक) : ‘चिऊ, काऊ या, दाणा खा... पाणी प्या अन् भुर्रकन उडून जा.’ ही साद घातली आहे. अंबासन येथील नूतन विद्यालयाच्या 550 हून अधिक विद्यार्थ्यांनी.
पक्षी संवर्धनासाठी अनोखा उपक्रम राबवित विद्यार्थ्यांनी पक्ष्यांची दाणा- पाण्याची सोय केली आहे. यासाठी त्यांनी टाकाऊ वस्तूंचा उपयोग करीत भांडी तयार केली असून, ती शाळेच्या व परिसरातील झाडांना लावली आहेत.
यावर्षी मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून उन्हाळ्याच्या तीव्र झळा जाणवत आहेत. वाढत्या शहरीकरणाबरोबरच जंगलतोडीचे प्रमाणही वाढल्यामुळे दिवसेंदिवस चिमणी, कावळे यांच्यासारखे पक्षी दुर्मीळ होत आहेत. भीषण उन्हाळा बघता बर्याच वेळा पक्ष्यांना खाद्यपदार्थ, पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे भटकंती करावी लागते.
तंत्रज्ञानासह रचनावादी करण्यासाठी तंत्रस्नेही रचनावाद विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी अंबासन येथील विद्यालय यशस्वी ठरले आहे. परिसरातील पशू- पक्ष्यांची माहिती व्हावी, भूतदया हे मूल्य रुजण्यास या उपक्रमामुळे शक्य होते.संगीता आहेर, उपशिक्षिका अंबासन, नाशिक.
चिमण्यांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या टाकाऊ वस्तूंपासून कृत्रिम घरटी तयार केली. त्यात पाणी व बाजरी, तांदूळ टाकले. काही तासांतच शाळेतील आवारात चिमण्यांचा चिवचिवाट बघत बाहेर पक्ष्यांची शाळा भरल्याचे शिक्षक व विद्यार्थ्यांना दिसून आले. विद्यार्थ्यांनी उन्हाळ्यात या भांड्यात दाणा-पाणी टाकण्याची जबाबदारी घेतली आहे. यावेळी मुख्याध्यापक व्ही. एन. पाडवी, व्ही. एन. पाटील, आर. ए. बच्छाव, एस. एम. जाधव, एस. बी. ठोंबरे, डी. एल. दाभाडे, जे. पी. खैरनार, एम. एस. पाटील, डी. जी. मोहिते, व्ही. बी. शिवदे उपस्थित होते.
पक्ष्यांना उन्हाळ्यात पिण्याचे पाणी आणि चारा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवला आहे. टाकाऊ वस्तुंपासून घरटी तयार केली.विशाखा मोरे, विद्यार्थिनी, सटाणा, नाशिक.