नाशिक

Nashik news | कोवळ्या हातांनी शिजत होती बिर्याणी; ‘बालमजुरी’चा पर्दाफाश, ६ बालकांची सुटका

काही व्यावसायिक स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लहान मुलांना कामाला जुंपत असल्याची माहिती आल्यानंतर कारवाई

पुढारी वृत्तसेवा

जळगाव: पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या कोवळ्या जीवाना कमी पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून कामे करून घेणाऱ्या चोपडा शहरातील बिर्याणी सेंटरचालकांवर पोलिसांनी गुरुवारी (दि. २३) सायंकाळी कारवाई केली. आझाद चौकातील गजबजलेल्या भागात सुरू असलेल्या 'आरंभ' आणि 'नानाश्री' सोयाबीन बिर्याणी सेंटरवर टाकलेल्या छाप्यात तब्बल ६ बालकामगारांची सुटका करण्यात आली असून, याप्रकरणी सोयाबीन बिर्याणीच्या मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, चोपडा शहरातील आझाद चौक परिसरात काही व्यावसायिक स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लहान मुलांना कामाला जुंपत असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारासचोपडा शहर पोलिसांनी आरंभ सोयाबीन बिर्याणी सेंटर' आणि 'नानाश्री सोयाबीन बिर्याणी सेंटर' या दुकानांवर अचानक धाड टाकली असता, तिथे अल्पवयीन मुले श्रमाचे काम करताना आढळून आले.

पोलिसांनी याप्रकरणी शरद सुकलाल कोळी (वय ४१, रा. वराड, ता. चोपडा - आरंभ बिर्याणी) आणि सतिष बाबुलाल कोळी (वय २९, रा. कृष्णापुर, ता. चोपडा - नानाश्री बिर्याणी) या दोघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

परराज्यातील बालकांचाही समावेश

पोलिसांनी सुटका केलेल्या मुलांमध्ये परशुराम दिलीप भिल्ल (१५, रा. रामपुरा), संदेश जितेंद्र जाधव (१४, रा. आदर्शनगर, मूळ रा. बडवाणी, मध्यप्रदेश) यांच्यासह अबसार खान ईब्राहीम खान (१५), आबिद अली लियाकत अली (१७), रेहान खान इम्रान खान (१४) आणि हसनैन सादीक शेख (१४, सर्व रा. सानेगुरुजी वसाहत व खुर्शीदअली, चोपडा) यांचा समावेश आहे. मध्यप्रदेशातील मुलांनाही येथे आणून राबवून घेतले जात असल्याचे यानिमित्ताने उघड झाले आहे. ही कारवाई पोलीस कॉन्स्टेबल अतुल मोरे यांच्या फिर्यादीवरून दोन गुन्हे दाखल करण्यात आली. पुढील तपास सहायक फौजदार दीपक विसावे आणि पोलीस नाईक संदीप भोई हे करीत आहेत. दरम्यान, शहरातील इतर हॉटेल्स आणि टपरी चालकांचे धाबे दणाणले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT