नाशिक : मुलीच्या मृत्यूनंतर पतीने मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा आरोप एका विवाहितेने शहर पोलिसांकडे केला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तक्रारदार महिलेच्या पतीकडे तपास करीत मुलीचा पुरलेला मृतदेह बाहेर काढला. पाण्यात बुडून मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती पतीने दिली आहे. त्यामुळे शवविच्छेदन अहवालानंतर मुलीच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, पती-पत्नी विभक्त राहत असताना मुलीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी म्हसरुळ पोलिस तपास करीत आहेत.
वैष्णवी विकास वळवी (दीड वर्ष) असे मृत्यू चिमुकलीचे नाव आहे. वैष्णवीचे वडिल विकास व आई विद्या यांच्यात कौटुंबिक कलह आहे. त्यामुळे दोघांचा वाद गंगापूर पाेलिस ठाण्यात गेला. तेथे विद्याने पतीसह सासरच्या इतर नातलगांविरोधात पैशांची मागणी व छळवणुकीची तक्रार नाेंदविली आहे. त्यानंतर दोघे विभक्त राहत होते. वैष्णवीचा ताबा विकास यांनी घेतला. विकासने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दाेन दिवसांपूर्वी वैष्णवी घराजवळ खेळत हाेती. त्यानंतर ती शेजारील विहिरीत पडल्याने तिचा बुडून मृत्यू झाला. काही वेळाने घटना लक्षात येताच, विकासने तिला विहिरीतून बाहेर काढले. मृत्यूनंतर तिच्यावर म्हसरुळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. या प्रकाराची माहिती वैष्णवीची आई विद्या यांना मिळाली. त्यांनी 'डायल ११२' ला फाेन करून माहिती दिली. त्यानंतर, पाेलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, म्हसरुळचे वरिष्ठ निरीक्षक अतुल डहाके, उपनिरीक्षक सचिन मंद्रुपकर तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक व नातलग स्मशानभूमीत पाेहाेचले. जेथे वैष्णवीला पुरण्यात आले, त्या ठिकाणाहून तिचा मृतदेह बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. गुरुवारी (दि.१३) शवविच्छेदन होणार असून त्यानंतर वैष्णवीच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. याप्रकरणी म्हसरुळ पाेलिसांत आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.