चांदवड : पुढारी वृत्तसेवा
गेल्या महिनाभरापासून प्रचंड उकाड्याने होरपळून निघालेल्या चांदवड तालुक्याला रविवारी सायंकाळी अखेर वळीव पावसाने दिलासा दिला. विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्याच्या जोरावर तब्बल एक तास कोसळलेल्या या पावसामुळे संपूर्ण तालुक्यात वातावरणात गारवा निर्माण झाला.
उष्णतेने त्रस्त नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला, तर खरीप हंगामाच्या तोंडावर झालेल्या या पावसामुळे शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी (दि. २४) सायंकाळी चारच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होण्यास सुरुवात झाली. दिवसभर कडक उन्हामुळे तापलेले वातावरण काही क्षणातच काळ्याकुट्ट ढगांनी व्यापले.
त्यानंतर विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार वळीव पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर इतका होता की, काही वेळातच शहरातील रस्त्यांवरून पाण्याचे प्रवाह वाहू लागले. गटारी तुडुंब भरून वाहत होत्या.
शहरासह मंगरूळ, गणूर, हरसूल, हरनूल, पाथरशेंबे, दुगाव, कोकणखेडे, गंगावे, विटावे, काजीसांगवी, रायपूर, निमोण, दरेगाव, वड, वराडी गावांतही पावसाने हजेरी लावली. उघड्यावर ठेवलेला कांदा, मका व इतर शेतीमाल झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली. दीर्घकाळाच्या उष्णतेनंतर पडलेल्या या पावसामुळे जमिनीला ओलावा मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
आगामी खरीप हंगामासाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा ४० ते ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने नागरिक त्रस्त झाले होते. दुपारनंतर रस्ते ओस पडत होते. अशा परिस्थितीत अचानक बरसलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आणि नागरिकांनीही पहिल्या पावसाचा मनमुराद आनंद घेतला. पहिल्याच वळीव पावसाने तालुक्यात दमदार हजेरी लावत आगामी मान्सूनची चाहूल दिल्याचे चित्र दसून आले.