नाशिक : शहरातील वाहतूक कोंडीसोबत गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शहर पोलिसांनी सीएसआर निधीतून शहरात सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शहरात सुमारे 700 सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरात येत्या महिनाभरात हे सीसीटीव्ही कार्यान्वित होऊन त्याचा थेट फायदा पोलिसांसह नाशिककरांना मिळणार आहे.
स्मार्ट सीटीअंतर्गत शहरात बसवलेले सीसीटीव्ही अद्याप पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेले नाहीत. त्यामुळे पोलिसांनाही शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी किंवा गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सन 2025 मध्ये वाहतुकीसंदर्भातील गुन्हेगारी रोखण्यासाठी लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शहरात सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानुसार सीएसआर निधी वापरून त्यांनी शहरात सुमारे 700 सीसीटीव्ही बसवण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहायक आयुक्त सुधाकर सुराडकर यांनी पंचवटी, सरकारवाडा, अंबड व नाशिक रोड या वाहतूक विभागांना त्यासंदर्भातील सूचना केल्या आहेत. वाहतूक कोंडीची संभाव्य ठिकाणे, कारवाई, अवजड वाहतुकीचे नियोजन, सिग्नलची वेळ यासंदर्भात सखोल माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच वाहतूक पोलिसांच्या पथकांकडून प्राप्त अहवालांनुसार शहरातील कोंडी फोडण्यासाठी महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (न्हाई) व इतर संबंधित विभागांसोबत पोलिस चर्चा करणार आहेत.
'स्मार्ट सिटी' अंतर्गत शहरात बसविण्यात आलेल्या 600 कॅमेऱ्यांचे नियंत्रण पोलिस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात उपलब्ध आहे. ई- चलन कारवाईसाठी पोलिसांना प्रशिक्षण दिले असले, तरी सीसीटीव्हींचे वायरिंगचे काम पूर्ण न झाल्याने बेशिस्त चालकांवर आपोआप ई-चलन करण्याची कारवाई बारगळली आहे. दरम्यान, पोलिसांना गुन्हेगारांसह वाहतुकीची माहिती घेण्यातही अडचणी येत आहेत. त्यामुळे पोलिस आयुक्तालयाने सीएसआर निधीतून शहरात सुमारे 700 सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी 70-80 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, जानेवारी 2025 च्या अखेरपर्यंत त्याचे काम पूर्ण होणार आहे.संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक.