नाशिक : महात्मानगर येथील डॉ. पंड्या रुग्णालयात महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने सोमवारी (दि.९) छापा टाकून गर्भपात करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मात्र बंदी असलेल्या औषधांचा साठा जप्त केला होता. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयित डॉक्टरला ताब्यात घेतले आहे.
महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण यांच्यासह अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक सुरेश देशमुख, प्रवीण हारक आणि गंगापूर पोलिसांचे पथक यांनी संयुक्तपणे सोमवारी सायंकाळी ही कारवाई केली होती. त्यात रुग्णालयात पथकास बंदी असलेल्या गर्भपाताच्या गोळ्यांचा साठा आढळून आला. तसेच नर्सिंग होम साठी लागणारा परवाना आढळून आला नाही. याप्रकरणी डॉ. चव्हाण यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात डॉ. पंड्या रुग्णालयाचे संचालक डॉ. आर. एम. पंड्या यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. त्यात नर्सिंग होमचा परवाना नुतनीकरण नसल्याने व बंदी असलेल्या गर्भपाताच्या गोळ्यांचा साठा केल्याप्रकरणी डॉ. पंड्याविरोधात वैद्यकीय गर्भपात अधिनियम, नर्सिंग होम अधिनियम आणि भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल केला आहे.