नाशिक : शहराच्या विकासाला गती देणारे दोन महत्त्वपूर्ण प्रकल्प मार्गी लागले असून, कॅनॉल रोड आणि लेफ्ट बँक कॅनॉलच्या विकासाला मंजुरी मिळाली आहे. जेहान सर्कल ते एबीबी सर्कलला जोडणाऱ्या मार्गापासून सुरू होणारा कॅनॉल रोड मोतीवाला कॉलेजपर्यंत जाणार आहे. या रस्त्यामुळे गंगापूर रोडवरील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना पर्यायी सक्षम मार्ग उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, लेफ्ट बँक कॅनॉल परिसराचा साबरमती नदीकाठ विकासाच्या धर्तीवर विकास करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याने, शहराच्या सौंदर्यात तसेच सार्वजनिक सुविधांमध्ये भर पडणार आहे. महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली.
गंगापूर रोडवर वाढती वाहतूक आणि वारंवार होणारी कोंडी लक्षात घेता कॅनॉल रोड महत्त्वाचा पर्यायी मार्ग ठरणार आहे. जेहान सर्कल ते एबीबी सर्कलला जोडणाऱ्या मार्गापासून पुढे मोतीवाला कॉलेजपर्यंत हा मार्ग विकसित केला जाणार आहे. त्यामुळे गंगापूर रोडवरील वाहतुकीचा काही भार या पर्यायी मार्गावर वळविणे शक्य होणार आहे.
कॅनॉल रोड आणि लेफ्ट बँक कॅनॉल विकासामुळे नाशिकच्या वाहतूक व्यवस्थेला तसेच शहराच्या सौंदर्याला मोठी चालना मिळणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी समन्वयाने काम करत आहेत. शासनाचे मार्गदर्शन आणि प्रशासनाच्या सहकार्याने नाशिकच्या विकासाला अधिक वेग देऊन शहराला आधुनिक, सुंदर आणि नागरिकांसाठी सुविधायुक्त बनविण्यास आम्ही
कटिबद्ध आहोत. हिमगौरी आहेर-आडके, महापौर
गणेशोत्सवासाठी प्रशासन सज्ज
१ गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणपती आगमन, विसर्जन आणि संबंधित व्यवस्थेबाबत प्रशासनाने आवश्यक सूचना दिल्या आहेत. उत्सव सुरळीत, सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय ठेवण्यात येत आहे. १५ सप्टेंबर रोजी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे अधिकारी प्रत्यक्ष 'ग्राउंड'वर उतरून गणेशोत्सवाच्या तयारीसह विविध विकासकामांचा आढावा घेणार आहेत. यावेळी प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्यावर भर दिला जाणार आहे.
कॅनॉल परिसराचे रूपडे पालटणार
२ लेफ्ट बँक कॅनॉलच्या विकासालाही मंजुरी देण्यात आली आहे. या परिसराचा विकास करताना नागरिकांना आवश्यक सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासह शहराच्या सौंदर्यात भर देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. साबरमती रिव्हरफ्रंटच्या धर्तीवर कॅनॉल परिसर विकसित करण्याची संकल्पना असून, प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर या भागाचे स्वरूप बदलण्याची अपेक्षा आहे.