नाशिक : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांमुळे होणाऱ्या अपघातांची मालिका कायम आहे. महामंडळाच्या नाशिक विभागात गेल्या आठ महिन्यात बसगाड्यांचे १२० अपघातांची नोंद झाली आहे. त्यामध्ये २२ व्यक्तींचा बळी गेला असून १९६ जण जखमी झाले. त्यामुळे अपघातांना प्रतिबंध करण्यासाठी नाशिक विभागाने पावले उचलत चालकांचे समुपदेशन करण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या महिनाभरात राज्यामध्ये एसटी महामंडळाचे बसगाड्यांचे अपघात घडले. या अपघातांमध्ये काही प्रवाशांना जीव गमावावे लागले. काहीजण जखमी झाले. नाशिक जिल्ह्यात आठ दिवसांमध्ये झालेल्या अपघातात महिला व युवतीला प्राणाला मुकावे लागल्याची दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे एसटी महामंडळाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उभे ठाकले. दरम्यान, नाशिक विभागात एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत बसगाड्यांच्या १२० अपघातांची नोंद झाली आहे.
विभागात झालेल्या अपघातांपैकी बहुतेक अपघात हे चालकांच्या चुकीमुळे झाल्याचे निदर्शनास आले. याव्यतिरिक्त पादचाऱ्यांसह खासगी दुचाकी आणि चारचाकी चालकांच्या चुकीमुळे तसेच बसगाड्यांचे टायर फुटणे आदींसह अन्य तांत्रिक कारणांमुळे हे अपघात घडले आहेत. त्यामध्ये २२ निष्पापांना जीव गमवावा लागला असून १९६ जण जखमी झाले. तर गेल्यावर्षी याच कालावधीशी तुलना केल्यास राज्य परिवहन महामंडळाला अपघात काही प्रमाणात कमी करण्यास यश प्राप्त झाले आहे. २०२३ च्या एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत नाशिक विभागात १२३ अपघातांची नोंद झाली होती. त्यावेळी २८ मृत्यू तर २३० जण जखमी झाले होते. त्या तुलनेत यंदा अपघातांची संख्या केवळ तीनने घटली असली तरीही प्राणांतिक व जखमी होण्याचे प्रमाण कमी आहे. महामंडळाच्या दृष्टीने ही काहीअंशी दिलासा देणारी बाब आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या नियमानुसार अपघातानंतर पुढील २४ ते ४८ तासांपर्यंत चालकांची स्टीयरिंग ड्युटी बंद ठेवण्यात येते. अपघातात प्राणहानी झाली असल्यास अशा घटनेत चालकांना अधिक काळ ड्यूटीपासून दूर ठेवले जाते. तसेच अपघाती मृत्यू प्रकरणांमध्ये चालकाचा सहभाग निदर्शनास आल्यास नियमानुसार निलंबनाची कारवाई होते. तसेच निलंबन कालावधी पूर्ण झाल्यानंतर चालकांना पुन्हा रुजू करुन घेताना प्रशिक्षण घेणे बंधनकारक असते.
नाशिक विभागाने कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ३ समुपदेशक हे वर्षभरासाठी मानधनावर नियुक्त केले जाणार आहे. समुपदेशकांना त्यांचे कर्तव्य ठरवून देण्यात आले असून त्यामध्ये कर्मचाऱ्यांचे मानसिक ताणतणावाचे निवारण करणे, त्यांच्याशी वैयक्तिक संवाद साधताना त्यांच्या अडी-अडचणी समजून घेणे तसेच वैयक्तिक स्तरावर त्याचे निराकरण करायचे आहे. आवश्यक तेथे वरिष्ठांना अहवाल सादर करत कर्मचाऱ्यांना पुढील उपचाराची गरज लक्षात आणून देणे तसेच आगारास महिनाभरातून तीनदा भेटी देणे आदी कर्तव्य पार पाडावी लागणार आहे.