नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मुलांनी उत्तम शिक्षण घेऊन आपले, कुटुंबाचे, समाजाचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे, हे प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते. नाशिकमध्ये गेल्या २५ वर्षांपासून ज्योतिष व धार्मिक विधीचे काम करणारे धर्मेंद्रकुमार भार्गव यांनीही आपल्या मुलांसाठी असेच स्वप्न पाहिले. त्यासाठी त्यांनी आणि त्यांच्या पत्नी सुमनदेवी यांनी अनेक अडचणींचा सामना करत मुलांच्या शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले.
त्यांच्या या प्रयत्नांना आता मोठे यश मिळाले असून, त्यांची कन्या पूजा आणि पुत्र गजेंद्र या दोघांचीही भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोमध्ये निवड झाली आहे.
पूजा भार्गव हिचा जन्म ३१ जुलै २००१ रोजी झाला.
तिचे प्राथमिक शिक्षणापासून ते सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगपर्यंतचे शिक्षण नाशिकमधील गुरू गोविंद सिंग महाविद्यालयात झाले. शिक्षणात सातत्य ठेवत तिने सॉफ्टवेअर क्षेत्रात कौशल्य संपादन केले.
जानेवारी २०२४ मध्ये तिची इस्रोच्या सॅटेलाइट प्रकल्पाशी संबंधित डेटा सायंटिस्ट पदासाठी निवड झाली. त्यामुळे भार्गव कुटुंबातील पहिली व्यक्ती अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात दाखल झाली. यानंतर अवघ्या काही वर्षांतच गजेंद्र भार्गव यानेही बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत इस्रोमध्ये प्रवेश मिळवला. ६ सप्टेंबर २००६ रोजी जन्मलेल्या गजेंद्रचे शिक्षणही नाशिकमध्येच झाले. गुरू गोविंद सिंग संस्थेतून त्याने दहावीनंतर डिप्लोमा शिक्षण घेतले.
डिझायनिंग क्षेत्रातील कौशल्याच्या जोरावर त्याची ऑगस्ट २०२६ मध्ये इस्रोमध्ये डिझायनर पदासाठी निवड झाली. त्यामुळे एकाच कुटुंबातील बहीण-भाऊ देशाच्या अंतराळ संशोधन संस्थेत कार्यरत होण्याचा मान भार्गव कुटुंबाला मिळाला आहे.
मुलांच्या या यशामागे आई-वडिलांचा मोठा त्याग आहे. मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देताना आई सुमनदेवी यांनी रात्री उशिरापर्यंत त्यांच्या अभ्यासात मदत केली. शाळा-महाविद्यालयात घेऊन जाने-आणणे, अभ्यासासाठी आवश्यक वातावरण निर्माण करणे आणि मुलांना सातत्याने प्रोत्साहन देणे, अशी जबाबदारी त्यांनी पार पाडली.
धर्मेंद्रकुमार भार्गव यांनीही आर्थिक व कौटुंबिक अडचणी असतानाही मुलांच्या शिक्षणात कोणतीही कमतरता पडू दिली नाही. ते गेल्या २५ वर्षांपासून नाशिकमध्ये ज्योतिष, पूजा-पाठ आणि धार्मिक विधीचे कार्य करीत आहेत. मूळचे राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील दौलतपुरा परिसरातील असलेले भार्गव कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकशी जोडले गेले आहे.
"मी आयुष्यात काही बनू शकलो नाही, तरी माझ्या मुलांनी मोठे व्हावे, देशासाठी काम करावे आणि आपल्या कुटुंबाचे, समाजाचे व देशाचे नाव उज्ज्वल करावे, हे माझे स्वप्न होते. आज दोन्ही मुले इस्रोमध्ये कार्यरत होत असल्याने माझे स्वप्न पूर्ण झाले आहे."- धर्मेंद्रकुमार भार्गव, वडील