नाशिकमधील पुलांच्या ऑडिटची गरज निर्माण झाली आहे.  Pudhari News Network
नाशिक

Nashik Bridge | नाशिकमधील 36 पूल 'स्ट्रक्चरल ऑडिट'विना

महापालिकेचे नुसतेच कागदी घोडे : आता म्हणे, सिंहस्थ निधीची प्रतीक्षा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : सतीश डोंगरे

प्रयागराजप्रमाणे नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीसारखी दुर्घटना होऊ नये, म्हणून महापालिकेने गोदावरी, नासर्डी आणि वालदेवी या तीन नद्यांवरील १२ पुलांसह शहरातील अन्य २४ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हा निर्णय कागदावरच विरला.

रविवारी (दि. १५) मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील लोखंडी पूल दुर्घटनेनंतर पुन्हा शहरातील ३६ पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा प्रश्न ऐरणीवर आला. मात्र, सिंहस्थ निधीवरच पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट अवलंबून असल्याने, नाशिककर खरोखरच सुरक्षित पुलांवरून दररोज प्रवास करतात काय? असा प्रश्न निर्माण होत आहे

प्रयागराज कुंभमेळ्यात झालेल्या भाविकांच्या गर्दीचा अंदाज घेत, २०२६-२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये २० कोटींपेक्षा अधिक भाविक येण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यानुसार प्रशासनाकडून नियोजन सुरू आहे. प्रयागराजमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीसारख्या घटनेची नाशिकमध्ये पुर्नरावृत्ती होणार नाही, याचीही खबरदारी घेतली जाणार असल्याचे प्रशासन सांगत आहे. मात्र, शहरात असलेल्या ३६ पुलांच्या सक्षमतेच्यादृष्टीने काय उपाययोजना केल्या जात आहेत, हा खरा प्रश्न आहे. त्यातच कुंडमळा (मावळ) येथील इंद्रायणी नदीवरील जुना लोखंडी पूल कोसळून चार पर्यटकांचा मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर पुन्हा एकदा शहरातील पुलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पटलावर आला आहे.

नाशिककरांना या प्रश्नांचे हवे उत्तर

  • संबंधित पुलाची सद्यस्थिती काय ?

  • पुलाची वहनक्षमता किती ?

  • बांधकामाला काही इजा झाली आहे का?

  • पुलाला तडे गेलेला भाग ?

  • पुलाच्या संरचनेवर झालेला परिणाम

  • पुलाची कालवैधता किती?

२०१५ मध्येही झाले होते ऑडिट

२०१५ मध्ये झालेल्या मागील सिंहस्थात महापालिकेने पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. त्यावेळी नाशिकरोड बिटको चौक उड्डाणपुल, पंचवटी कन्नमवार पूल आणि अन्य प्रमुख पुलांचे ऑडिट केले हाेते. मात्र, काही पूल आता कमकुवत झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी सिंहस्थात भाविकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही तडजोड न करता प्रशासनाकडून पुलांचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची गरज आहे.

एप्रिलमध्ये महापालिकेने गोदावरी, नासर्डी व वालदेवी नदीवरील १२ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला होता. सिंहस्थ आराखड्यानंतर तज्ज्ञांच्या मदतीने अहवाल तयार करण्याचे नियोजन होते. मात्र, सिंहस्थ निधीबाबत अनिश्चितता आणि कालमर्यादा लक्षात घेता, नवीन पूल उभारणे किंवा जुन्या पुलांचे मजबुतीकरण शक्य आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या पुलांच्या ऑडिटची आहे गरज

सिंहस्थात गोदावरी नदीवरील अहिल्यादेवी होळकर पूल, रामवाडी पूल, लक्ष्मण पूल, रामसेतू, गाडगे महाराज, लक्ष्मीनारायण पूल. नासर्डी नदीवरील सातपूर आयटीआय, मिलिंदनगर, भाभानगर, हॉटेल क्वालिटी इनजवळ, रामदास स्वामी आश्रम तर वालेदवी नदीवरील लहान पूलाचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट होणे गरजेचे आहे.

होळकर पुलाला हादरे

स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनी होळकर पुलाखाली पूर नियंत्रणासाठी मॅकेनिकल गेट बसवत आहे. तेव्हा केलेल्या खोदकामामुळे पुलाला हादरे बसले होते. एका स्टार्टअप कंपनीने हादऱ्यांची कंपने मोजून तसा अहवालही स्मार्ट सिटीला दिला होता. त्यामुळे या पुलाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत असून, स्ट्रक्चरल ऑडिटनंतरच सर्व काही स्पष्ट होईल.

शहरातील सर्व ३६ पुलांच्या स्ट्रक्चर ऑडिटसाठी सिंहस्थ निधीची प्रतीक्षा आहे. निधी प्राप्त होताच, त्याबाबतची निविदा काढली जाणार आहे.
संजय अग्रवाल, शहर अभियंता, महापालिका. नाशिक.

स्व:निधीतून दोनच पुलांचे ऑडिट

महापालिकेने स्व:निधीतून दोन पुलांचे ऑडिट करण्यासाठी निविदा काढली आहे. लक्ष्मीनारायण आणि रामवाडी पूल या पुलांचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. मात्र, अन्य पुलांच्या ऑडिटची प्रक्रिया पूर्णत: सिंहस्थ निधीवर अंवलबून आहे.

निधी प्राप्त झाल्यास पुढे काय?

३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण होणार आहे. त्यामुळे सिंहस्थ विकासकामांसाठी अवघ्या १६ महिन्यांचा अवधी महापालिकेकडे आहे. अद्याप निधी प्राप्त नसल्याने, ही कामे रखडलेली आहेत. दरम्यान, निधी प्राप्त झाल्यानंतर महापालिका पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटची निविदा प्रसिद्ध करणार. संबंधितांना निविदा देण्याच्या प्रक्रियेला किमान दोन ते तीन महिन्यांचा अवधी लागू शकतो. त्यानंतर ऑडिटसाठी सहा महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. अशात एखादा पूल वापरास असुरक्षित असल्यास महापालिकेला जेमतेम काही महिन्यात समांतर पूल उभारणे शक्य होणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT