Nashik doctor Bribe
त्या लाचखोर डॉक्टरांना पोलिस कोठडी File Photo
नाशिक

Nashik Bribe | त्या लाचखोर डॉक्टरांना पोलिस कोठडी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आबिद आबु अत्तार (४०) व वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत एकनाथ खैरनार (४२) यांना तक्रारदाराकडून ३० हजार रुपयांची लाच घेताना (Nashik Bribe) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रविवारी (दि.१४) रंगेहाथ पकडले आहे. दोघांनाही न्यायालयाने मंगळवारपर्यंत (दि. १६) पोलिस कोठडी सुनावली आहे. दोघांच्या घरझडतीत स्थावर मालमत्तांचे कागदपत्रे आढळून आली.

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात बंदी शिक्षा भोगत असून त्याचे वय ६५ पेक्षा जास्त असल्याने व १४ वर्षे शिक्षा भोगल्याने त्याच्या मित्राने जामिनासाठी अर्ज केला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शासकीय समितीने संबंधित कैद्यास फिट फॉर फिटनेस प्रमाणपत्रावर स्वाक्षरी केली. मात्र प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात संशयित डॉ. अत्तार व डॉ. खैरनार यांनी तक्रारदाराकडे रविवारी (दि. १४) ४० हजारांची लाच मागितली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पंचासमाेर तडजोड करीत दोघांनी तक्रारदाराकडून ३० हजार रुपयांची लाच घेतली. त्यामुळे विभागाने दाेघांनाही अटक केली. दोघांविरोधात मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, 'एसीबी'च्या पथकाने दोघा लाचखोरांच्या घराची झडती घेतली असून, दोघांकडे स्थावर मालमत्तेची कागदपत्रे पथकाच्या हाती लागली आहे. तसेच दोघाही संशयितांच्या मूळ गावी पथकांकडून त्यांच्या स्थावर मालमत्तेचा शोध घेतला जात आहे. दोघांनाही मंगळवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

SCROLL FOR NEXT