Pudhari File Photo
नाशिक

Nashik Bribe News | लाच मागणाऱ्या सहायक पोलिस निरीक्षकाविरोधात गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : जागा खरेदी-विक्रीच्या व्यवहारात खरेदीदाराने दिलेल्या तक्रार अर्जावरून गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात दोन एजंटकडून नाशिक रोड पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षकाने ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे नाशिक रोड पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक गणेश किसन शेळके यांच्याविरोधात लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्याविरोधात एका जागा खरेदीदाराने नाशिक रोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. प्लॉटची खरेदी न केल्याप्रकरणी ही तक्रार होती. या तक्रार अर्जाच्या तपासासाठी शेळके यांनी तक्रारदारासह आणखी एकास चौकशीसाठी बोलावले. त्यावेळी शेळके यांनी डिसेंबर २०२३ मध्ये दोघांना तुमच्याविरोधात गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकेन, अशी धमकी देत ५० हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाने शहानिशा करीत सापळा रचला. पंचांसमोर शेळके यांनी तडजोड करीत ४० हजार रुपयांची मागणी केली. मात्र, त्यांनी लाचेची रक्कम स्वीकारली नाही. अखेर वर्षभरानंतर तक्रारदाराने शेळकेंविरोधात लाचेची मागणी केल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.

'पोलिस कोणत्याही कामाचे पैसे घेत नाही'

तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार, १३ डिसेंबर २०२३ रोजी लाचेचे पैसे देण्यासाठी ते शेळके यांच्याकडे गेले असता पंचांसमोर शेळके यांनी 'पोलिस कोणत्याही कामाचे पैसे घेत नाही' असे बोलून पैसे घेतले नव्हते. त्यामुळे शेळके यांना कारवाईची भनक लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, तक्रारदार जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी फेब्रुवारी ते जून या कालावधीत कारागृहात होते. त्यानंतर पत्नीची तब्येत बिघडल्याने व त्यांचा मृत्यू झाल्याने तक्रारदाराने शेळकेंविरोधात तक्रार नव्हती दिली. अखेर तक्रारदाराने वर्षभरानंतर शेळकेंविरोधात तक्रार दिली.

वर्षभरात लाचखोरांवर १५१ गुन्हे

नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जानेवारी ते डिसेंबर २०२४ या कालावधीत १५१ गुन्हे दाखल करून लाचखोरांवर कारवाई केली. राज्यात नाशिक विभागाने सर्वाधिक कारवाई केली आहे. या कारवायांमध्ये २१९ लाचखोर पकडले असून, त्यात वर्ग एकचे १७, वर्ग दोनचे २०, वर्ग तीनचे ११२, वर्ग चारचे १४ कर्मचारी, इतर लोकसेवक २० व ३६ खासगी व्यक्तींना पकडण्यात आले आहे. या लाचखोरांनी तक्रारदारांकडे ३८ लाख ४८ हजार ४५० रुपयांच्या लाचेची मागणी केली तसेच स्वीकारल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT