नाशिक : राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत मोठी कारवाई केली. या कालावधीत विभागाने ६८३ सापळे रचून एक हजार दोन लाचखोरांना लाच घेताना किंवा मागताना रंगेहाथ पकडले. या कारवाईत तक्रारदारांकडून एकूण ३ कोटी १८ लाख २४ हजार ४१० रुपयांची लाच स्वीकारल्याचे उघड झाले आहे. यामध्ये सर्वाधिक लाच रक्कम वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांनी घेतली किंवा मागितली असून, ती तब्बल १ कोटी ७९ लाख २३ हजार ११० रुपये इतकी आहे.
भ्रष्टाचाराला वेसन घालण्यासाठी राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सक्रीय असतो. या विभागाकडे तक्रार केल्यानंतर, तिची शहानिशा केल्यानंतर लाचखोरास पकडण्यासाठी सापळा रचला जातो. त्यानुसार, राज्यात गत वर्षभरात ६८३ सापळे रचून एक हजार दोन लाचखोरांना पकडण्यात आले आहे. यात लाचखोरांनी तक्रारदारांकडे सुमारे तीन कोटी १८ लाख रुपयांची लाच मागितली किंवा घेतली. त्यातही सर्वाधिक ५३ लाख ४२ हजार ५०० रुपयांच्या लाचेची मागणी पोलिस दलातील २०१ लाचखोरांनी केली. त्याखालोखाल प्रादेशिक परिवहन विभागातील २१ लाचखोरांनी ५० लाख २३ हजार ३५० रुपयांची लाच घेतली किंवा मागितली. तर तिसऱ्या क्रमांकावर समाज कल्याणमधील १६ लाचखोरांनी ४२ लाख १७ हजार २०० रुपयांची लाच घेतल्याचे कारवाईतून समाेर आले आहे.
चालू वर्षात १ जानेवारी ते २३ फेब्रुवारी दरम्यान, विभागाने ११४ सापळे रचून १६६ लाचखाेरांना पकडले आहे. या लाचखोरांनी तक्रारदारांकडून ३१ लाख ५५ हजार ९९५ रुपयांची लाच घेतली किंवा मागितली. मात्र त्यांना विभागाने पकडल्याने त्यांचा बेत फसला.
लाचखोरांवरील कारवाईत वर्ग तीनचे सर्वाधिक ५१२ कर्मचारी आढळून आले आहेत. त्याखालोखाल १७१ लाचखोर या खासगी व्यक्ती असल्याचे आढळून आले. या व्यक्ती त्या - त्या विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्या नावे लाच मागत किंवा स्विकारल्याचे समाेर आले आहे. खासगी व्यक्तींनी १२ लाख ५० हजार ३५० रुपयांची लाच घेतल्याचे उघड झाले आहे.
वर्ग --- लाचेची रक्कम
वर्ग १ --- ५८,२६,५०० (६२)
वर्ग २ --- ३७,७९,१०० (१०२)
वर्ग ३ --- १,७९,२३,११० (५१२)
वर्ग ४ --- ३,०१,६०० (४९)
इतर लोक सेवक --- २७,४३,७५० (१०६)
खासगी व्यक्ती --- १२,५०,३५०