नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार भगवान त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी सोमवारी (दि. 29) त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनास आले असता, दत्तक ब्रह्मगिरी आणि कुशावर्त तीर्थ याबाबत आपण केलेल्या घोषणांचे काय झाले? असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित करताच तुम्हीच पाठपुरावा करा आणि तुम्हीच या प्रश्नाची उकल करा, असे म्हणत बगल दिली.
ब्रह्मगिरी-अंजनेरी रोप वेबाबत तसेच मुळेगाव अंजनेरी रस्त्याबाबत माहिती घेतली. यावेळेस खा. हेमंत गोडसे यांच्याशी चर्चा केली. सांस्कृतिक मंत्रालयामार्फत कुशावर्त येथे गोदावरीची महाआरती करण्यासाठी सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी मंदिर विश्वस्त व पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे यांनी केली. याबाबत त्यांनी प्रस्ताव तयार करण्याची सूचना केली. यावेळेस विश्वस्त कैलास घुले, पुरुषोत्तम कडलग उपस्थित होते.
मंदिरात पूजेप्रसंगी त्यांच्यासमवेत भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, ज्येष्ठ नेते ॲड. श्रीकांत गायधनी, माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, माजी आरोग्य सभापती सागर उजे, पंकज धारणे, शहराध्यक्ष प्रशांत बागडे, संतोष भुजंग, बंडू आहेर, सुयोग वाडेकर आदी उपस्थित होते. दरम्यान आमदार हिरामण खोसकर आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांनी मंत्री महोदयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अंजनेरी गडाच्या विकासाबाबत चर्चा केली. शासनाने अंजनेरी गडाच्या विकासाकडे लक्ष द्यावे, भाविक आणि पयर्टक यांना सुविधा उपलब्ध करण्यासाठी ठोस कार्यक्रम हाती घ्यावात आदी मागण्या केल्या.
असे आहे दत्तक प्रकरण
दि. 12 फेब्रुवारी 2018 रोजी वनमंत्री मुनगंटीवार त्र्यंबकेश्वर देवदर्शनाला आले होते. त्यावेळेस त्यांनी ब्रह्मगिरी हिरवागार करण्यासाठी आणि कुशावर्ताची स्वच्छता व सुशोभीकरण करण्यासाठी दत्तक घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर तत्कालीन वन खात्याचे सचिव खारगे यांनीदेखील भेट दिली. वन खात्याने ब्रह्मगिरी विकासाचा 14 कोटींचा आराखडा सादर केला. मात्र नंतर त्याचे काय झाले? तो कोठे अडकला याबाबत काहीही माहिती पुढे आलेली नाही. दरम्यानच्या कालावधीत तत्कालीन नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांनी मुंबई येथे सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. सुमारे पाच कोटी रुपयांचा कुशावर्त तीर्थ सुशोभीकरण आराखडा तयार करण्यात आला. पण तो जिल्हाधिकारी कार्यालयात धूळखात पडला आहे. याबाबत मुनगंटीवार यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी हसत हसत, हा प्रश्न पत्रकारांनीच सोडवायला पाहिजे. पत्रकारांनी प्रश्न निर्माण करण्यापेक्षा त्यांची उकल करावी, असे उत्तर देत जबाबदारी झटकली.