नाशिक

नाशिक : भाजपच्या ड्रिम प्रोजेक्ट्सना महापालिका आयुक्तांचा ठेंगा

अंजली राऊत

नाशिक: पुढारी वृत्तसेवा
केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता असली तरी नाशिक महापालिकेतील प्रशासकीय राजवटीतील सलग दुसऱ्या वर्षाच्या अंदाजपत्रकात भाजपचे ड्रिम प्रोजेक्ट्स असलेल्या आयटी पार्क आणि लॉजिस्टिक पार्कला मात्र स्थान मिळू शकलेले नाही. लोकसभा विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना या प्रकल्पांसाठी कुठलीही तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली नसल्याने भाजपचा पुन्हा एकदा स्वप्नभंग झाला आहे.

भाजपचे तत्कालीन महापौर सतीश कुलकर्णी यांनी आयटी पार्कसाठी पाठपुरावा केला होता. आडगाव शिवारात ३६५ एकर क्षेत्रात आयटी पार्क उभारण्यासाठी सर्वप्रथम महापालिकेची स्वमालकीची १० एकर जागा आरक्षित केली गेली. या जागेच्या आजूबाजूला असलेल्या उर्वरित जागा संबंधित मालकांकडून भाडेतत्वावर घेतली जाणार होती, त्यासाठी इच्छुक जागा मालकाकडून एक्स्प्रेस ऑफ इंटरेस्टद्वारे प्रतिसादही मागविण्यात आला होता. जवळपास १० जागामालकांनी इच्छा दर्शविली होती. एकीकृत नियमावलीतील तरतुदीनुसार ग्रीन बेल्टमध्ये आयटी पार्क उभारता येणे शक्य आहे. त्यासाठी अतिरिक्त एफएसआयची तरतूद आहे. यात ५० टक्के जागा आयटी पार्कसाठी २० टक्के जागेवर निवासी क्षेत्र, पाच टक्के जागेत अमेनिटी, तर पाच टक्के जागा व्यवसायासाठी अशी तरतूद आहे. त्यासाठी एका खासगी हॉटेलमध्ये आयटी कंपन्यांची परिषदही भरविण्यात आली होती. आयटी कंपन्यांकडून ४० लाख चौरस फूट जागेची मागणी नोंदविण्यात आली होती. या संपूर्ण योजनेचा अहवाल बनवण्याची जबाबदारी एक रुपया मानधनावर एका ठेकेदाराने घेतली होती. मात्र त्यानंतर हा प्रकल्प  पुढे अंमलबजावणीच्या दिशेने सरकू शकला नाही. महापालिकेच्या महसूलवृद्धीसाठी आडगाव जकात नाका ट्रक टर्मिनसलगत लॉजिस्टिक पार्क उभारण्याची घोषणाही भाजपने केली होती. परंतु या योजनेलाही मुहूर्त लाभू शकलेला नाही. गेल्या दोन वर्षांच्या प्रशासकीय राजवटीत या दोन्ही प्रकल्पांसाठी अंदाजपत्रकात कुठलीही तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर भाजपची कोंडी होण्याची शक्यता आहे.

पार्क, लॉजिस्टिक पार्कसारखे प्रकल्प उभे राहिले, तर महापालिकेचे किमान एक ते दीड हजार कोटींचे वार्षिक उत्पन्न वाढू शकते. त्याशिवाय स्थानिकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील. मात्र, प्रशासनाला याकडे लक्ष देण्यास वेळ नाही हे दुर्दैवी आहे. – सतीश कुलकर्णी, माजी महापौर, नाशिक.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT