नाशिक : राहुल गांधी शहरात दाखल होण्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी (दि.२) सकाळी भाजपच्या महिला मोर्चाने आंदोलन केले. याप्रसंगी महापौर हिमगौरी आहेर-आडके, आमदार देवयानी फरांदे, भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा डॉ. भारती पवार, महिला मोर्चा अध्यक्षा स्वाती भामरे आदी. (छाया: हेमंत घोरपडे) 
नाशिक

Rahul Gandhi Go Back Nashik-'राहुल गांधी गो बॅक'च्या भाजपकडून घोषणा

'नारीशक्ती वंदन अधिनियम'ला काँग्रेसच्या विरोधाचा निषेध

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : 'नारीशक्ती वंदन अधिनियम'ला काँग्रेसने विरोध केल्याचा आरोप करत लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या निषेधार्थ भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काळ्या साड्या, काळ्या टोप्या आणि काळे कपडे परिधान करून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले. 'राहुल गांधी गो बॅक', 'राहुल गांधी जबाब दो', 'नारीशक्ती जिंदाबाद', 'महिला सशक्तीकरणाचा विजय असो' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

काँग्रेसच्या दहादिवसीय शिबिराच्या समारोपासाठी राहुल गांधी नाशिकमध्ये दाखल होण्यापूर्वीच बुधवारी (दि.२) सकाळी भाजपच्या महिला मोर्चाने आंदोलन केले. महापौर हिमगौरी आहेर-आडके, आमदार देवयानी फरांदे, भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा डॉ. भारती पवार, महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्वाती भामरे आणि भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या नेतृत्वाखाली हे निषेध आंदोलन करण्यात आले. लोकसभा व विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के प्रतिनिधित्व देण्याच्या तरतुदीला पाठिंबा देत भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेचा निषेध केला.

'नारीशक्तीला विरोध करणाऱ्या काँग्रेसचा धिक्कार असो', 'नारीशक्ती वंदन अधिनियमाचा विजय असो', 'भारतमाता की जय', 'वंदे मातरम्' अशी घोषणाबाजी केली. आंदोलनात भाजपच्या महिला पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. महिलांचे राजकीय सक्षमीकरण, नारीशक्तीचा सन्मान आणि महिलांना ३३ टक्के राजकीय प्रतिनिधित्व देण्याच्या मागणीला पाठिंबा देणे, हा आंदोलनाचा प्रमुख उद्देश असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. आंदोलनानंतर भाजपच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

काळ्या साड्या, काळे शर्ट

काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या भूमिकेचा निषेध नोंदविण्यासाठी महिला कार्यकर्त्यांनी काळ्या साड्या, युवतींनी काळे पोशाख, तर पुरुष कार्यकर्त्यांनी काळे शर्ट परिधान केले होते. हाताला काळ्या फिती बांधूनही निषेध व्यक्त करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT