नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकमध्ये एबी फॉर्म वाटपावरून झालेल्या गोंधळाला मीच जबाबदार आहे, असे समजून त्यावर पडदा टाका. जुन्या, नव्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन महापालिका निवडणुकीत विजय संपादन करावे, असे आवाहन करताना उमेदवारी वाटपात निष्ठावंतांवर झालेल्या अन्यायाबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. ४) श्रद्धा लॉन्स येथे भाजपतर्फे आयोजित विजय संकल्प मेळाव्यात चव्हाण बोलत होते. व्यासपीठावर भाजप प्रभारी तथा मंत्री गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले आदी उपस्थित होते. एबी फॉर्म वाटपावरील गोंधळाबाबत चव्हाण यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, नाशिकमध्ये झालेल्या प्रकाराचे अवलोकन केले जात आहे. ज्यांनी चुका केल्या त्यांच्यावर पक्ष कारवाई करणार आहे.
निवडणूक काळ कमी आहे म्हणून सध्या काही निर्णय घेणे योग्य नाही. सध्या जे काही घडले आहे याचे दडपण सर्वांनाच आहे. पण त्यावर आज पडदा टाकला तर ते योग्य राहील. त्यामुळे त्यावर सर्व मीच केले, असे समजून पक्षातील जुने-नवे कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन काम करावे, असे सांगत त्यांनी घडल्या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. निवडणूक जिंकायची आहे. नाशिककरांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे.
नाशिककरांच्या अडचणी सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, यात कोणतेही शंका नाही. मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांना राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस, देशांमध्ये नरेंद्र मोदी यांनी जी विकासकार्ये केलेली आहेत, जी समाजोपयोगी कार्य केलेली आहेत, त्याबाबतची माहिती पोहोचवा, असे आवाहन चव्हाण यांनी केले. आमदार सीमा हिरे आणि आमदार राहुल ढिकले यांनी या निर्धार मेळाव्याला संबोधित केले. शहराध्यक्ष सुनील केदार यांनी प्रास्ताविक, तर सुनील देसाई यांनी सूत्रसंचालन केले.
निकषाच्या आधारेच उमेदवारी
मेळाव्याला संबोधित करताना जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, महापालिका निवडणुकीसाठी १२२ जागांसाठी इच्छुकांची संख्या मोठी होती. त्यामुळे उमेदवाराची निवड करणे अवघड होते. काही निकषांच्या आधारावरच उमेदवारी वाटपाचा निर्णय घेतला गेला, असे नमूद करताना उमेदवारी न मिळाल्याने अनेक जण नाराज झाले. आता सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन महाजन यांनी केले.
आमदारांचे टोचले कान
एबी फॉर्म वाटपावरून झालेल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करताना प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी नाशिकमधील पक्षाच्या आमदारांचेही कान टोचले. आमदारांनी बुथ स्तरावरील यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर द्यावा. यंत्रणेला आवश्यक ती सामग्री उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना चव्हाण यांनी केल्या. कार्यकर्त्यांनी किमान दहा तास काम करून पक्षाची विचारधारा घराघरांत पोहोचवावी, असे आवाहनही चव्हाण यांनी केले.