ओझर (नाशिक) : आदिवासी आयुक्तालयावर सोग्रस फाट्यावरुन निघालेल्या बिर्हाड मोर्चाने नाशिक ते ओझरदरम्यान दहाव्या मैलावर चक्काजाम आंदोलन केल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतुक ठप्प झाली. वाहतुककोंडीमुळे नाशिक व चांदवड या दोन्ही बाजुंनी 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या यामुळे वाहनधारकांनी संताप व्यक्त केला. त्यातच वाहनधारकांना पावसाचा सामना करावा लागल्याने सुमारे 3 तास वाहतुककोंडी झाली.
नाशिक ते ओझरदरम्यान दहावा मैल येथे अनेक महिन्यांपासून वाहतूक कोंडी होत आहे. याचा मोठा फटका धुळे, सटाणा, नंदुरबार, चांदवड, पिंपळगावकडे जाणार्या वाहनधारकांना बसत आहे. धुळे, मालेगावकडून नाशिककडे येणार्या वाहनधारकांनाही या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. शासकीय आश्रमशाळेतील शिक्षकांची 1791 पदे बाह्यस्त्रोताद्वारे भरण्याचा शासननिर्णय तत्काळ रद्द करावा, यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग 3 व वर्ग 4 संघटनेचे राज्यातील 700 हून अधिक कर्मचारी रस्त्यावर उतरले आहे. या आंदोलनकर्त्यांनी नाशिकच्या दिशेने येतांना दहावा मैल येथे चक्काजाम आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले.
नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक व राष्ट्रीय महामार्ग जीवन प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकार्यांशी संपर्क साधला असून दोन ते तीन दिवसात येथे कर्मचार्यांची नेमणूक करण्यात येणार आहे त्यानंतरच ही वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल.दिलीप बनकर, आमदार, निफाड, नाशिक.
मात्र आंदोलनामुळे वाहतूक ठप्प होऊन नाशिक व चांदवड बाजूकडे दुतर्फा पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. त्यात पावसाची भर, आणि राष्ट्रीय महामार्ग जीवन प्राधिकरणाच्या ढिसाळ नियोजनामुळे वाहनचालक व प्रवाशांना अक्षरशः घाम फोडला. अनेक महिन्यांपासून याठिकाणी सतत वाहतूक कोंडी होत आहे. मात्र, प्रशासनाकडून कुठलीही ठोस उपाययोजना केली जात नसल्याने रोज सायंकाळी या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. दुपारी चारला पावसामुळे रस्त्यावर पाणी वाढल्याने चारचाकी वाहने धिम्या गतीने मार्गक्रमण करीत होती. त्यामुळे वाहतूक कोंडीत अधिकच भरच पडली.
बिर्हाड आंदोलनकर्त्यांनी कठोर भूमिका घेतल्याने सोमवारी (दि.16) दुपारी 5 वाजता आदिवासी विकासमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत चर्चा केली. यावेळी समस्येवर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी (दि. १७) दुपारी 1 ते 4 च्या दरम्यान मुख्यमंत्र्यांसमवेत बैठकीचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत जो निर्णय होईल त्यानूसार आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल, अशी माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली. तोपर्यंत नाशिक-मुंबई आग्रा महामार्गावरील कृष्णाई लॉन्स येथे आंदोलनकर्त्यांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे.