नाशिक : आदिवासी विभागाकडून करण्यात येणार्या 1791 शिक्षकांच्या भरतीप्रक्रियेला विरोध करण्यासाठी विविध आदिवासी संघटनांकडून आदिवासी आयुक्तालयावर शुक्रवार (दि.13) रोजी आजपासून बिर्हाड मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चा सोग्रस फाट्यावरून आज दुपारी बारा वाजता निघेल. नाशिकमध्ये येण्यास मोर्चास तीन दिवसांचा कालावधी लागणार असून, सोमवारी (दि.16) मोर्चा आदिवासी आयुक्तालयावर पोहोचेल. मोर्चात शेकडो आदिवासी सामील होणार असल्याची माहिती विविध आदिवासी संघटनांकडून देण्यात आली.
राज्यातील विविध शासकीय, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत 1791 शिक्षकांच्या नियुक्तीसाठी आदिवासी विकास विभागाने 21 मे 2025 रोजी 84 कोटी 74 लाखांच्या निविदेस प्रशासकीय मंजुरी दिल्याने कंत्राटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. या 1791 पदांवर 1 ते 10 वर्षांपासून 2400 कंत्राटी शिक्षक कार्यरत आहेत. हे शिक्षक कायम होण्याच्या प्रतीक्षेत असताना राज्य शासनाने बाह्य कंपनीमार्फत शिक्षक भरतीचा निर्णय घेतला. त्यामुळे या कंत्राटी शिक्षकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे. याला विरोध दर्शविण्यासाठी राज्य रोजंदारी वर्ग-3 आणि वर्ग-4 कर्मचारी संघटनेने मंगळवारी (दि. 3) आदिवासी विकासमंत्री प्रा. अशोक उईके यांची भेट घेत शिक्षक भरतीस विरोध दर्शविला. मात्र, चर्चा निष्फळ ठरल्याने शासनाच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी बिर्हाड मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
मोर्चाच्या संदर्भात झालेल्या बैठकीला आदिवासी विद्यार्थी संघटनेचे राज्य अध्यक्ष लकी जाधव, ललितकुमार चौधरी, योगिताबाली पवार, पंकज बागूल, अंकुश चव्हाण, पंकज जगताप आदी उपस्थित होते. मोर्चा सोमवारी (दि. 16) रोजी नाशकात पोहोचण्याची शक्यता आहे.
अखिल भारतीय आदिवासी युवा परिषद, आदिवासी बचाव, आदिवासी कोकणा-कोकणी समाज संघटना, आदिवासी विकास विभाग शासकीय मुख्याध्यापक महासंघ महाराष्ट्र, आदिवासी शिक्षक संघटना, रावण युवा फाउंडेशन, आदिवासी शक्ती सेना, आदिवासी नायक फाउंडेशन, आदिवासी रावण साम्राज्य, सत्यशोधक बहुजन आघाडी, अखिल भारतीय विद्यार्थी महासंघ, आदिवासी बचाव अभियान, राघोजी भांगरे क्रांती सेना, बिरसा ब्रिगेड.