घोटी (नाशिक) : मुंबई महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम करणाऱ्या कंपनीच्या सिमेंट मिक्सिंग करणाऱ्या मिलर वाहनाने दिलेल्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून त्यासाठी सिमेंट काँक्रीटचे मटेरिअल घेऊन येणाऱ्या मिलर ( एमएच १५ जेडब्ल्यू १४८९) ने दुचाकी (एमएच १५ सीबी ४६२८) ला धडक देत फरफटत नेले. यात दुचाकीस्वार सोमनाथ गंगाराम खडके (२०, रा. पिंपळगाव भटाटा) याचा मृत्यू झाला. त्यानंतर गाडी चालक तसेच कंपनीतील सर्व कामगार हे पळून गेल्याने वातावरण काही काळ तापले होते. दरम्यान, मयत सोमनाथ खडके याचे काका गोविंद हंबीर, नारायण हंबीर व मावसभाऊ सागर हंबीर यांनी मयताच्या कुटुंबाला मदत मिळत नाही तोपर्यंत मृतेदह उचलू न देण्याचा पवित्रा घेतल्याने बराच काळ तणाव निर्माण झाला होता. शेवटी वाडीवऱ्हे पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी मध्यस्ती करून वातावरण शांत केले. महामार्गाचे काम सुरू होऊन जवळपास ५ ते ६ महिने झाले, मात्र हे काम करणारी सीडीएस कंपनी अगदी मनमानी पध्दतीने काम करीत आहे. हे काम रखडल्याने दररोज अपघात होत असून अनेकांचा बळी गेला आहे.