पुढारी ऑनलाइन डेस्क ; जिल्हा रुग्णालयात काल घडलेल्या बाळ अदलाबदल प्रकरणी चौकशी समीती नेमण्यात आली होती. या समितीने केलेल्या चौकशीनंतर 9 जणांवर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित ठेवण्यात आली आहे. तपासात त्यांनी कर्तव्यात कसूर केली असल्याचे आढळून आले आहे.
काल घडलेल्या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात होता. यानंतर अखेर या प्रकरणाची गंभीर दखल घेत रुग्णालय प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे.
नांदूरनाका परिसरातील रूतिका महेश पवार या महिलेची रविवारी (दि. १३) रात्री जिल्हा रुग्णालयात प्रसूती झाली. प्रसूतीनंतर बाळ पुरूष जातीचे असल्याचे परिचारीकांनी रुतिका यांच्या नातेवाईकांना सांगितले. तसेच प्रसूती कक्षातील रजिस्टरवर तशी नोंदही केली. दरम्यान, बाळाचे वजन कमी असल्याने त्यास एसएनसीयू कक्षात उपचारासाठी दाखल केले. बाळाची तब्येत बिघडल्याने त्यास खासगी रुग्णालयात नेण्याचा सल्ला जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिला. त्यामुळे मंगळवारी (दि. १५) रात्री नातलगांनी डिस्चार्ज घेण्यास सुरुवात केली.
बाळाचा ताबा घेताना तो मुलगा नव्हे तर मुलगी असल्याचे नातलगांच्या लक्षात आले. त्यामुळे आम्हाला आमचा मुलगा द्या, अशी मागणी नातलगांनी केली. मात्र हे तुमचेच बाळ आहे असे परिचारीकांनी सांगितले. त्यामुळे नातलगांनी रुग्णालयातील नोंदी तपासल्या असत्या त्यावर पवार यांना मुलगा झाल्याची नोंद आढळून आली. त्यामुळे कक्षातील कर्मचारीही गोंधळात पडले. संतप्त नातलगांनी रुग्णालयात गोंधळ घालण्यास सुरूवात केली. प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे यांनी रुग्णालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. बुधवारी (दि. १६) सकाळी संबंधित घटनेची चौकशी समिती नेमण्यात आली. तसेच 'आम्हाला आमचा मुलगाच परत करा. आम्ही मुलगी ताब्यात घेणार नाही.' या प्रकाराची चौकशी करून दोषींना सेवेतून बडतर्फ करा अशीही मागणी नातलगांनी केली. जोपर्यंत मुलाचा ताबा मिळत नाही तोपर्यंत संबंधित मातेचा डिस्चार्ज घेणार नसल्याचाही पवित्रा नातलगांनी घेतला होता.
आरोग्य विभागाने अखेर या प्रकरणी कारवाई करत 9 जणांना दोषी ठरवत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी असा प्रस्ताव ठेवला आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास करण्यासाठी चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे.