Nashik News  
नाशिक

Nashik News | भुसावळ रेल्वे विभागात अनधिकृत विक्रेत्यांचे धाबे दणाणले; ३०५ जणांना रंगेहात पकडले!

६७ जणांकडून तब्बल ९८ हजारांचा दंड वसूल; रेल्वे प्रशासनाचा प्रवाशांना '१३९' चा आधार घेण्याचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

जळगाव: रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि गाड्यांमध्ये विनापरवाना घुसखोरी करणाऱ्या अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांची आता खैर नाही! भुसावळ रेल्वे विभागाच्या वाणिज्य शाखा आणि रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) संयुक्त 'सर्जिकल स्ट्राईक' करत तब्बल ३०५ अनधिकृत विक्रेत्यांना रंगेहात पकडले आहे. गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या या धडक मोहिमेमुळे रेल्वे स्थानक आणि गाड्यांमधील अनधिकृत फेरीवाल्यांचे धाबे दणाणले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६७ जणांवर थेट दंडात्मक कारवाई करत ९७ हजार ९५० रुपयांचा मलिदा वसूल करण्यात आला आहे.

तीन महत्त्वाच्या रेल्वे मार्गांवर 'क्लीन स्वीप'

भुसावळ रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, २८ मे ते १० जून या कालावधीत ही विशेष मोहीम राबविण्यात आली. प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे हा यामागचा मुख्य हेतू होता. या मोहिमेत मुख्यत्वे तीन रेल्वे कॉरिडोअर्सवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते: भुसावळ – खंडवा विभाग, भुसावळ – नाशिक विभाग, भुसावळ – बडनेरा विभाग या मार्गांवर धावणाऱ्या एक्स्प्रेस आणि प्रमुख स्थानकांवर आरपीएफच्या जवानांनी आणि वाणिज्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून या अनधिकृत विक्रेत्यांची धरपकड केली.

प्रशासनाचा कडक इशारा; '१३९' वर करा थेट तक्रार

रेल्वे प्रवाशांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य असून, अशी कारवाई भविष्यातही आणखी तीव्रतेने सुरूच राहील, असा थेट इशारा भुसावळ रेल्वे प्रशासनाने दिला आहे. "प्रवाशांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत केवळ अधिकृत आणि परवानाधारक स्टॉल्स किंवा विक्रेत्यांकडूनच खाद्यपदार्थांची खरेदी करावी. प्रवासात कुठेही खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत शंका आल्यास किंवा अनधिकृत विक्री आढळल्यास तात्काळ रेल्वेच्या १३९ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा 'रेलमदद' पोर्टलवर तक्रार नोंदवावी."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT