Black Magic Fraud Pudhari File Photo
नाशिक

Nashik Superstition Crime | अवघ्या चार महिन्यांत 75 भोंदू गजाआड; जिल्ह्यात सर्वाधिक 10 गुन्हे

Nashik Superstition Crime | भोंदूगिरीचे राज्यभर पेव ; नाशिक 'हॉटस्पॉट'

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : सतीश डोंगरे

नाशिकमधील गाजलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणांनंतर राज्यभर सुरू झालेल्या कारवाईत अवघ्या चार महिन्यांत तब्बल ७५ भोंदू बाबा, बुवा, मौलाना, पाद्री आणि तथाकथित धर्मगुरूंविरोधात विविध जिल्ह्यांत गुन्हे दाखल झाले आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक १० गुन्हे नोंदविल्याने 'नाशिक जिल्हा भोंदूंचा हॉटस्पॉट' तर ठरत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पोलिसांनी गजाआड केलेल्या भोंदूंप्रकरणी महिलांचे लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक, जादूटोण्याच्या नावाखाली मानसिक छळ, अंधश्रद्धेचा गैरफायदा घेऊन लुबाडणूक अशा गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. ग्रामीण भागाबरोबरच शहरांमध्येही भोंदूगिरीचे जाळे पसरल्याचे या घटनांमधून स्पष्ट होत आहे.

नाशिकमधील अशोक खरात प्रकरण उघडकीस आल्यानंतर अनेक पीडित महिलांनी पुढे येत तक्रारी दाखल करण्याचे धाडस दाखवले. त्यामुळे राज्यातील इतर जिल्ह्यांतील पीडितांनाही न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली असून, अनेक प्रकरणे आता समोर येऊ लागली आहेत. सामाजिक बदनामीची भीती आणि प्रतिष्ठेच्या कारणास्तव अद्यापही अनेक पीडित गप्प असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

भोंदूगिरीचे राज्यातील चित्र

  • चार महिन्यांत एकूण गुन्हे : ७५

  • नाशिक जिल्हा : १० (सर्वाधिक)

  • प्रमुख आरोप : लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक, जादूटोणा, अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक

  • कायदा : महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व समूळ उच्चाटन अधिनियम, २०१३

  • विशेष बाब : विविध धर्मांतील तथाकथित धर्मगुरूंविरोधात कारवाई

या ७५ प्रकरणांच्या यादीत विविध धर्मांतील स्वतःला धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणवून घेणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे. त्यामुळे अंधश्रद्धा-विरोधातील कारवाई केवळ एका धर्मापुरती मर्यादित असल्याच्या आरोपाही या आकडेवारीमुळे खोडून निघाल्याची चर्चा सुरू आहे.

नाशिक जिल्ह्यातील दहा प्रकरणे

राज्यात सर्वाधिक गुन्हे नाशिक जिल्ह्यात नोंदविले गेले आहेत. त्यामध्ये अशोक खरात, विठोबा वाल्मीक जाट (सातपूर), महेशगिरी उर्फ महेश काकडे (लासलगाव), चंद्रकांत माळी (इगतपुरी), कमलेश महाराज अधिकारी (इंदिरानगर), भगवान पगार (सटाणा), रौफ इब्राहिम शेख (मालेगाव), यौवन गोहाड (सायखेडा), तेलंगणा बाबा (पंचवटी) आणि डॉ. मोहन पुरी (सिन्नर) यांचा समावेश आहे.

जिल्हानिहाय चित्र

  • नाशिकनंतर पुणे जिल्ह्यात सर्वाधिक प्रकरणे असून, अहिल्यानगर, मुंबई, अकोला, यवतमाळ, नागपूर, सोलापूर, चंद्रपूर, धुळे, संभाजीनगर, अमरावती, लातूर, सांगली, ठाणे, नांदेड, रायगड, पालघर, जळगाव, भंडारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतही भोंदूगिरीविरोधात गुन्हे दाखल झाले.

"नाशिकमधील अंनिसचे कार्यकर्ते अधिक दक्ष व जागरूक आहेत. आम्ही भोंदूबाबांचा पर्दाफाश करण्यात यशस्वी झाल्यानेच, गुन्ह्यांची अधिक नोंद होत आहे."
— कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, अंनिस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT