आरोग्यसेवकांनी रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या देत कामबंद आंदोलन केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.  pudhari photo
नाशिक

Nashik | बिटको रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण, आरोग्यसेवकांचे कामबंद आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : नाशिक रोड येथील हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे (बिटको) रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, तसेच आरोग्यसेविकांना दमदाटी, मारहाण व शिवीगाळ केल्याचा प्रकार मंगळवारी (दि.१०) सकाळी १०.३० च्या सुमारास घडला. यावेळी आरोग्यसेवकांनी रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या देत कामबंद आंदोलन केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित नातेवाइकावर नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघातग्रस्त अभय रमणलाल संघवी यांना बिटको रुग्णालयात सकाळी ८ च्या सुमारास दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरू केले. त्यांच्या हाताला फ्रॅक्चर असल्याने डॉक्टरांनी एक्स रे काढण्याचा त्यांना सल्ला दिला. दरम्यान, डॉक्टरांचा राउंड सुरू असतानाच संघवी यांचा मुलगा परिचारिकांना न विचारताच त्यांची फाइल घेऊन जात होता. परिचारिकांनी हटकल्यानंतर एक्स रे काढण्यासाठी फाइल हवी असल्याचे त्याने सांगितले. मात्र, संबंधित परिचारिकेने डाॅक्टरांचा राउंड सुरू आहे. एक्स रे नंतरदेखील काढता येऊ शकतो, असे त्यास सांगितले. मात्र, संघवी यांच्या मुलाने एक्स रे विभाग तळमजल्यावर असल्याने, 'आम्हाला खाली-वर जाण्यास सांगितले जाते. योग्य उपचार केले जात नाही, असा आरोप करीत परिचारिका व आरोग्यसेविकेला दमदाटी केली. हा प्रकार रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र धनेश्वर यांना कळताच त्यांनी संबंधित वॉर्डात धाव घेत, नातेवाइकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने डॉ. धनेश्वर यांचा गळा धरत मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे.

दरम्यान, या प्रकारानंतर संतप्त डॉक्टर्स, परिचारिका आणि इतर आरोग्यसेविकांनी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या देत कामबंद आंदोलन केल्याने रुग्णसेवेचा बोजवारा उडाला होता. यावेळी माजी नगरसेवक जगदीश पवार आणि प्रताप मेहरूलिया यांनी मध्यस्थी करीत कर्मचाऱ्यांची समजूत काढली. रुग्णालयाच्या आवारात तत्काळ पोलिस चौकी द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

रुग्णालय आवारात पोलिस चौकी द्यावी, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. मात्र, पोलिस चौकी दिली जात नसल्याने, रुग्णाच्या नातेवाइकांकडून डाॅक्टर्स, परिचारिका, आरोग्यसेवकांवर हल्ले करण्याचे प्रकार सुरूच आहेत.
- डॉ. तानाजी चव्हाण, मुख्य आरोग्य व वैद्यकीय अधिकारी, मनपा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT