नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांच्यावर दाखल झालेला अविश्वास प्रस्तावासाठी मंगळवारी (दि.११) विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत सभापती पिंगळे यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला जाईल. अविश्वास दाखल केलेले संचालक विदेशवारी करून नाशिकमध्ये परतले. सोमवारी (दि.10) परतलेल्या संचालकांची गुप्त बैठक होऊन यात पुढील रणणीतीवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
बाजार समितीतील पिंगळे गटाच्या 12 पैकी 9 संचालकांनी बंड करत, माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्या गटात सामील झाले. चुंभळे गटाचे सहा आणि बंड केलेल्या 9 अशा एकूण 15 संचालकांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे सभापती पिंगळे यांच्या विरोधात अविश्वास दाखल करण्याचा प्रस्ताव दाखल केला होता. त्यावर जिल्हाधिकारी शर्मा यांनी 11 मोर्च रोजी विशेष सभा बोलवली. प्रस्ताव दाखल केल्यानंतर सर्व 15 संचालक हे विदेशवारीसाठी रवाना झाले होते. विदेशात गेलेले संचालक सोमवारी दाखल होण्याची शक्यता होती. मात्र, हे संचालक रविवारी (दि.9) रात्री उशीरा शहरात दाखल झाले. दुसरीकडे आम्ही नाशिकमध्येच असल्याचे चुंभळे यांनी सांगितले.
नाशिक बाजार समिती ही राज्यातील आघाडीची बाजार समिती असून, तेथे आपली सत्ता आणण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन प्रयत्नशील आहेत. यापूर्वीही पिंगळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर कृउबातील राजकारण सतत चर्चेत राहिले होते. प्राप्त माहितीनुसार जे दोन संचालक पिंगळे यांच्याकडे आहे त्यांना देखील सोबत घेण्यासाठी प्रयत्न चुंभळे गटातर्फे सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, पिंगळे देखील चुंभळे यांच्यासोबत गेलेल्या काही संचालकांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे. जे संचालक चुंभळे यांच्यासोबत गेले आहेत त्यातील काही संचालक मुळचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचेच असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अविश्वासाची उत्सुकता अधिकच वाढली आहे.