नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणल्यानंतर बंडखोर आणि चुंभळे गटाचे सर्व संचालक विदेशवारीला रवाना झाल्याची चर्चा आहे. या हालचालीमागे बंडाळीत कोणताही दगाफटका होऊ नये आणि पिंगळेंशी संवाद टाळण्याची रणनीती असल्याचे सांगितले जात आहे.
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते तथा नाशिक कृउबाचे सभापती पिंगळे यांनी एप्रिल 2023 मध्ये झालेल्या निवडणुकीत 18 पैकी 12 जागा जिंकत सत्तेचा सोपान चढला होता. त्यावेळी विरोधी, माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्या गटाला केवळ सहा जागांवर समाधान मानावे लागले होते. स्पष्ट बहुमत असल्याने पिंगळे यांची सभापतिपदी बिनविरोध निवड झाली. त्यांनी उपसभापती पदासाठी सहा - सहा महिन्यांचे आवर्तन निश्चित करत समर्थक संचालकांना खूश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एककल्ली कारभाराविरोधात संचालकांमध्ये खदखद वाढत गेली. अखेर ही खदखद बंडाच्या रूपाने बाहेर पडली. पिंगळे गटाचे नऊ संचालक विरोधी चुंभळे यांना जाऊन मिळाले. चुंभळे गटाचे सहा व पिंगळे गटाचे नऊ असे एकूण १५ संचालक एकत्र आल्याने लगेच पिंगळेंविरोधात अविश्वास प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला गेला. चुंभळे यांनी ही खेळी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, सभापती पिंगळे यांनी या फोडाफोडीमागे मंत्री गिरीश महाजन यांचा हात असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे बाजार समितीचे राजकारण तापले आहे. त्यातच, चुंभळे यांच्याकडे वळविलेल्या संचालकांचे परतीचे दोर कापले आहेत. या संचालकांचे मोबाइल फोन काढून घेण्यात आले असून, हे सर्व संचालक सोमवारी (दि. 3) रात्री उशिरा मुंबईमार्गे थेट विदेशात रवाना करण्यात आल्याचे बोलले जात आहे. हा गट आता थेट ११ मार्चला होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीलाच परतेल, असे सांगितले जात आहे.
सभापती पिंगळे आणि चुंभळे यांच्यातील राजकीय संघर्षामुळे बाजार समितीच्या संचालकांची सुखसोय वाढली आहे. मागील पंचवार्षिकमध्ये चुंभळे यांनी पिंगळे यांच्या विरोधात संचालकांना एकत्र करून सहलीला पाठवले होते. प्रत्युत्तरादाखल, पिंगळे यांनीदेखील संचालकांसाठी विशेष दौर्याचे आयोजन केले. एप्रिल 2023 मध्ये पॅनल विजयी झाल्यानंतर पिंगळे यांनी आपल्या गटातील संचालकांना तब्बल २१ दिवस काश्मीर आणि चीन दौरा घडविला होता. आता पुन्हा एकदा चुंभळे यांनी संचालकांना विदेशवारी घडविली आहे. त्यामुळे या सत्तासंघर्षात संचालकांची चांगलीच चंगळ होत आहे.