सुरक्षेसाठी जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर जमावबंदीचे आदेश  pudhari photo
नाशिक

Nashik | सुरक्षेसाठी जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर जमावबंदीचे आदेश

पर्यटन स्थळांवर गस्त घालणे, ई पास साठी प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : वर्षा सहलींचा आनंद घेताना काही अतिउत्साही, हुल्लडबाज पर्यटकांमुळे पर्यटन स्थळांवर दुर्घटना होण्याची भिती असते. त्यामुळे पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. तसेच वनविभागासोबत मिळून पर्यटन स्थळांवर गस्त घालणे, ई पास उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न सुरू केला आहे.

पावसाला सुरुवात झाल्यानंतर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे पर्यटकांनी बहरण्यास सुरुवात होत आहे. जिल्ह्यातील धबधबे, किल्ले, निसर्गरम्य ठिकाणांवर पर्यटकांची गर्दी वाढत असून सुट्टीच्या दिवशी त्यात मोठी वाढ होत आहे. पावसाचा जोर वाढल्यानंतर निसर्ग अधिक बहरून पर्यटकांना आकर्षित करत असल्याने येत्या काही दिवसांत पर्यटनस्थळांवरील गर्दी वाढेल. त्यामुळे या ठिकाणी अपघात, दुर्घटना होण्याची शक्यता असते. त्यात जीवीतहानी देखील होते. हे प्रकार टाळण्यासाठी पोलिस अधीक्षक देशमाने यांनी खबरदारी म्हणून जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी हा आदेश आहे. त्याचप्रमाणे पर्यटकांना ई पास उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून वनविभागासोबत मिळून गस्त घातली जाणार आहे. जेणेकरून पर्यटकांवर लक्ष ठेवले जाईल. तसेच स्थानिक नागरिक, सर्पमित्र, पोहणारे, सामाजिक संस्था यांच्यासाेबत मिळून बचावकार्य केले जाईल.

या पर्यटनस्थळांवर गर्दी

ब्रह्मगिरी, अंजनेरी, हरिहर, साल्हेर-मुल्हेर, रामशेज किल्ला, चामरलेणी, पहिने नेकलेस फॉल, दुगारवाडी धबधबा, कुरुंगवाडी, वाघेरा, भास्करगड, बाहुली, त्रिंगलवाडी, मांगीतुंगी, सप्तश्रृंग गड, इगतपुरी, वाडिवऱ्हे यासह इतर पर्यटनस्थळांवर पर्यटक, भाविकांची गर्दी असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT