नाशिक : महिला लैंगिक शोषण प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदू अशोक खरात याने एसआयटी चौकशीत दिलेल्या उत्तरामुळे तपास यंत्रणा अवाक झाली आहे. 'मी कोणतेही चुकीचे कृत्य केलेले नाही, जे काही केले ते विधीचा भाग होता आणि त्यासाठी संबंधित महिलांची संमती होती, असे वक्तव्य त्याने केल्याची माहिती समोर आली आहे.' या उत्तरामुळे तपास यंत्रणांसमोर नवे प्रश्न निर्माण झाले असून, आरोपीची भूमिका संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे.
तपासादरम्यान समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अशोक खरात याने धार्मिक विधीच्या नावाखाली महिलांना जाळ्यात ओढत त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप आहेत. मात्र, स्वतःवरील आरोप नाकारत त्याने दिलेले स्पष्टीकरण 'चोरावर मोर' अशा प्रकारचे असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणात त्याची सखोल चौकशी सुरू असून, विविध पैलूंवर तपास यंत्रणा काम करत आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत शंभरहून अधिक महिलांचे शोषण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या महिलांमध्ये नाशिक, अहिल्यानगर, शिर्डी, मुंबई आणि पुणे या भागांतील महिलांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान, एसआयटीकडून पीडित महिलांचे जबाब, डिजिटल पुरावे, आर्थिक व्यवहार आणि इतर महत्त्वाच्या बाबींची तपासणी सुरू आहे. या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, राज्यभर या प्रकरणाकडे लक्ष लागले आहे.