कैलास भवन (1910) (सर्व छायाचित्रे - सुधाकर गोडसे)
नाशिक

नाशिक : देवळालीतील आरोग्यधाम, बंगल्यांची भुरळ पर्यटकांना

ब्रिटिशकालीन पूर्ववैभवामुळे देवळालीचे वेगळेपण टिकून

पुढारी वृत्तसेवा

देवळाली (नाशिक) : सुधाकर गोडसे

देशात नव्हे, तर जगात देवळाली कॅम्पचे नाव स्वच्छ हवामान व आरोग्यदायी वातावरण यासाठी प्रसिद्ध असून, ब्रिटिशांनीदेखील याचे महत्त्व लक्षात घेऊन येथे आपल्या लष्कराची छावणीनिर्मिती करताना नागरी विभागासाठीही अनेक वसाहती निर्माण केल्या आहेत. त्याचे साक्षीदार असलेल्या अनेक आरोग्यधाम व बंगले आजही सुस्थितीत असून, ते पर्यटकांचे प्रमुख केंद्र झाले आहेत. देवळालीचे हे पूर्ववैभव असेच टिकून राहावे व येथील पर्यावरणपूरक हवामान यापुढेही असेच राहावे, अशी देवळालीकरांसह दूर असलेल्या नागरिकांचीही इच्छा आहे.

बेला व्हिस्टा (1910)

स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी सह्याद्रीच्या कुशीत डोंगररांगा फिरून आपल्या सैन्य दलाच्या प्रशिक्षणासाठी दूरदृष्टीचा वापर करीत देवळाली छावणीची स्थापना केली. लष्कराच्या दृष्टीने सोयीची, समुद्रसपाटीपासून उंचीवर असलेल्या या जागेचे महत्त्व ओळखून आपल्या वसाहती स्थापन केल्या. आजही लष्करी भागात गेल्यास त्या नजरेस येतात.

बैजान बाटलीवाला

हिरवी गर्द वनराई, छोट्याशा डोंगरांनी वेढलेला हा भूभाग मानवीदृष्ट्या आरोग्यास पोषक हवामान व वातावरण निर्माण करणारा असल्याने ब्रिटिशांनी या ठिकाणी आपल्या वसाहती स्थापन करायला सुरुवात केली. त्यातूनच नैसर्गिक घटकांच्या आधारे बंगल्यांची निर्मिती होऊन 'आरोग्यधाम' ही संकल्पना निर्माण झाली.

दीपक महल (१८९०)

यामध्ये डॉक्टर, कामगार, खेळण्यासाठी उद्याने अशा सुविधा देण्यात आल्यानंतर मुंबई, गुजरात, पाकिस्तान अशा भागांतून लष्कराचे मोठे अधिकारी या ठिकाणी येत असत. त्यांच्या लप्करी वसाहतींबरोबर आजूबाजूला राहात असलेल्या नागरिकांना सोयी पुरवल्या जाण्याकरिता कटक मंडळाची (कॅन्टोन्मेंट बोर्ड) स्थापना केली.

हिरा हॉल (१८७०)

लष्करी भाग असल्याने या ठिकाणी तीन मजली इमारतींवर बांधकाम करण्यात येऊ नये असा नियमच झाला. आजही या भागात तीन मजलीपेक्षा अधिक उंचीची एकही इमारत पाहण्यास मिळत नाही.

असे आहेत विविध आरोग्यधाम आणि फोटो...

गत 200 वर्षांपासून या भागात हिंदू, पारशी, जैन, मुस्लीम अशा समाजांच्या वतीने विविध भागांत आरोग्यधामची निर्मिती करण्यात आली. त्यात प्रामुख्याने दीपक महल (१८९०), हिरा हॉल (१८७०), श्यामकुंज बंगला (1899 ), जमाल सॅनेटोरिअम (1902), डॉ. के. एन. बहादूरजी मेमोरियल पारसी सॅनेटोरिअम (1900), बेला विस्टा (1910), कैलास भवन (1910), द्वारकादास प्रागजी भाटिया सॅनेटोरिअम (1911), सेठ भगवानदास नरोत्तमदास सॅनेटोरिअम (१९१५), कलावती हिंदू आरोग्य भवन (१९२१), लीलावती हिंदू आरोग्यधाम (१९२२), नर सेनेटोरियम (१९२८), देना आरोग्य भवन (१९५१), देवजी खेतसी कच्छी आरोग्यधाम (१९६७) हे येतात. देवजी रतनसी जैन आरोग्यधाम (१९८०) यांसह इतरही आरोग्यधाम, जुने बंगले हे लॅमरोड, धोंडी रोड, बार्न्स स्कूल रोड, रेस्ट रोड या भागांत असून सुस्थितीत आहेत.

द्वारकादास प्रागजी भाटिया सॅनेटोरिअम (1911)
देवजी खेतसी कच्छी आरोग्यधाम (१९६७)
डॉ. के. एन. बहादूरजी मेमोरियल पारसी सॅनेटोरिअम (1900)
जमाल सॅनेटोरिअम (1902)
जानकी कुटीर
कलावती हिंदू आरोग्य भवन (१९२१)
कोठारी हिंदू आरोग्यधाम
नूर सॅनेटोरिअम
शेठ भगवानदास सॅनेटोरिअम

मायानगरीला देखील भुरळ

चित्रपटनगरीला देवळालीच्या वास्तूंचे आकर्षण फार पूर्वीपासून असून, येथील संपूर्ण लाकडी बनावटीची घरे सजावटी व हिरव्यागार बागा यामुळे देवळालीतील अनेक ब्रिटिशकालीन वास्तूंमध्ये अनेक चित्रपटांचे चित्रीकरण वेळोवेळी झालेले आहे व आजही होत असते. येथील जुन्या वास्तूंचे आकर्षण असल्याने हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत मंडळी देवळालीला नेहमीच पसंती देतात. देवळालीत कोरा कागज, आ गले लग जा, नया दौर, दुश्मन, जियो शान से, इम्तिहान यांसारखे, तर आजच्या काळात तेरे नाम, खाकी, डॉली की डोली आणि मराठी चित्रपटांमधील गुलाम बेगम बादशाह यांसह अनेक नामवंत दिग्दर्शकांच्या चित्रपटांचे चित्रीकरण नेहमीच या परिसरात सुरू असते. देवळालीचे हे पूर्ववैभव असेच टिकून राहावे व येथील पर्यावरणपूरक हवामान यापुढेही असेच राहावे, अशी देवळालीकरांसह दूर असलेल्या नागरिकांचीही इच्छा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT