नाशिक

Nashik | रेन हार्वेस्टिंगमुळे आरोग्य विद्यापीठाची ६८ पाणी टँकरपासून सुटका

अंजली राऊत

[author title="नाशिक : आनंद बोरा" image="http://"][/author]
महाराष्ट्रातील पक्षितीर्थ समजल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात भारतातल्या तिसऱ्या आणि महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला लेफ्टनंट जनरल (निवृत्त) व आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर या जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमास आल्या होत्या. डॉ. माधुरी कानिटकर यांनी भारतीय लष्करातील सगळ्यात महत्त्वाचे पद भूषविले आहे. त्यांना अतिविशिष्ट सेवा मेडल आणि विशिष्ट सेवा मेडल भारतीय सेनेत मिळाले आहे. 37 वर्षांच्या गौरवशाली काळात त्यांनी भारतीय सेनेत विविध विक्रम नोंदविले. त्या बालरोगतज्ज्ञ असून, त्यांनी लष्करात वैद्यकीय सेवादेखील दिली आहे. डॉक्टर, शिक्षिका आणि लष्कर अशा तीनही सेवा पार पाडणाऱ्या डॉ. माधुरी कानिटकर या आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरूदेखील आहेत. त्यांनी यावेळी दैनिक 'पुढारी'ला मुलाखत देताना अनेक प्रश्नांची उत्तरे मनमोकळेपणाने दिली.

डॉ. माधुरी कानिटकर

निसर्गावर प्रेम करणाऱ्या डॉ. माधुरी कानिटकर यांनी हे अभयारण्य भरतपूरपेक्षा सुंदर असल्याचे सांगितले. डॉक्टर, शिक्षिका आणि लष्करी कारकिर्दीविषयी विचारले असता त्या म्हणाल्या की, तिन्ही गोष्टींचा समन्वय झाला, त्यात आनंद मिळाला. डॉक्टर म्हणून लोकांची सेवा केली. सोल्जर म्हणून देशाची केली आणि भविष्याची सोय केली टीचर होऊन. शिक्षिकेचा रोल आपल्याला अधिक भावल्याचेही त्या सांगतात. पर्यावरण दिनाविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, देशातील प्रत्येकाने आपल्या परिसराची काळजी घेतली, तर आपला देश हा स्वर्गच होईल. नाशिकच्या वाढत्या तापमानाविषयी प्रश्न केल्यावर त्या म्हणाल्या की, उष्णता वाढली की, आपण एअर कंडिशनर लावतो. खोली जरी थंड होते पण पर्यावरण, बाहेरील वातावरण अजून तापते. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होतेय. यासाठी खरे तर आपण पाण्याचे कन्झर्वेशन केले पाहिजे आणि झाडे भरपूर लावली पाहिजे. त्यामुळे पक्षी आणि प्राणीदेखील येतात. या पक्ष्यांकडून माणसाने शिकणे आवश्यक आहे. त्यामुळे वातावरण नक्की सुखद होईल. क्लायमेट चेंजविषयी मोठ मोठे देश बोलताहेत पण पर्यावरणाबरोबर राहण्याची आपली संस्कृती होती. पण आपण तिकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा त्रास होत आहे.

स्पर्धा परीक्षांमध्ये लाखो विद्यार्थी अभ्यास करीत आहेत त्याच्याविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, अभ्यास हा केलाच पाहिजे. शिक्षण फक्त लर्न टू अर्न नसावे, तर शिक्षण म्हणजे त्याचा समाजाला फायदा होईल आणि आपण त्याचा वापर कसा करतो, हे महत्त्वाचे आहे. पर्यटन देशी आवडते की विदेशातील, असा प्रश्न केला असता त्या म्हणाल्या की, नैसर्गिक सौंदर्य आपल्या देशात मोठ्या प्रमाणात बघावयास मिळते. पण सोय आणि सुविधा आपल्याकडे दिसत नाहीत. विदेशात पर्यटन करताना डिसिप्लीन बघावयास मिळते. आपले लोक विदेशात जातात, त्यावेळी ते घाण करीत नाहीत पण इथे नियम पाळत नाहीत, याचे वाईट वाटते. आपल्या देशात जितके सौंदर्य आहे आणि जितकी जैववैविध्य आहे. ती इतर कुठेच नाही. आणि प्रत्येक जागेचे वैशिष्ट्यदेखील वेगळे आहे.

दिल्लीपासून कन्याकुमारीपर्यंत मी फिरले आहे. आपला देश खूप सुंदर आहे. त्याचे मूल्य आपल्याला कळलेले नाही, असेही त्या म्हणाल्या मुलांना केवळ पुस्तकी ज्ञान द्यावे की, बाहेर फिरून माहिती द्यावी, या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, मुलांना बाहेर घेऊन जाणे आवश्यक असून, केवळ ट्रिप काढून मजा करणे हा उद्देश नसावा. एज्युकेटेड बट इललिटरेट असे लोक झाले आहेत. स्किल आणि एज्युकेटेड फार कमी आहेत आणि या स्किलमध्ये केअर ऑफ नेचर, केअर ऑफ इन्वॉयर्नमेंट आणि केअर ऑफ सोसायटी याची जाणीव करून देणे आवश्यक आहे.आरोग्य विद्यापीठ परिसराविषयी विचारले असता, त्या म्हणाल्या की, आरोग्य विद्यापीठाचा परिसर खूप सुंदर, प्रदूषणमुक्त आहे आणि मी पहिली कुलगुरू आहे की, मी तिथे राहते. इथल्या निसर्गाने मला प्रेमात पाडलेय. निसर्गाबरोबर आपण जितके राहू, तितकी निसर्ग आपली काळजी घेतो. दोन वर्षांत आमचे विद्यापीठ पूर्ण ग्रीन कॅम्पस झालेले आहे. सोलरचा उपयोग केला असून, वॉटर कन्झर्वेशन-रेन हार्वेस्टिंग आम्ही केले आहे. मागील वर्षापर्यंत आम्हाला विद्यापीठात ६८ पाण्याचे टँकर बोलवावे लागत होते. पण या वर्षी एकही टँकर लागला नसून, कॅम्पस हिरवेगार करण्यात आम्हाला यश आले आहे. एक कॅम्पस आम्ही थंडगार केले आहे, असा प्रयोग नाशिकरांनीदेखील करून पूर्ण नाशिक थंड करण्याचे आवाहनदेखील त्या करतात.

शिक्षणाला मुलांपर्यंत नेणे आवश्यक

ऊसतोड कामगारांच्या मुलांविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, आज डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करणे आवश्यक आहे. मुलांना स्मार्ट टेक्नॉलॉजी वापर करून शिक्षकांनी त्या ठिकाणी जाऊन शिकविले पाहिजे. शाळा आहे पण शिक्षक नाही, अशा ठिकाणी मुलांना शिक्षणापर्यंत न नेता, शिक्षणाला मुलांपर्यंत नेणे आवश्यक आहे. कोविडने खूप काही शिकविले आहे. आता मोबाइल मुलांच्या हातात न देता स्मार्ट फोनने शिक्षण आणि आरोग्याच्या योजना राबविण्यासाठी डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करणे आवश्यक असल्याचेदेखील त्या सांगतात.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT