नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील ताज्या आकडेवारीनुसार, ऐन उन्हाळ्यात भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले असून, शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात व एप्रिलच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकांचे नुकसान झाले.
काढणीला आलेल्या मालाचा दर्जा खालावला, तर पुढील पिके पावसाच्या भीतीने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बाजारात आणल्याने आवक वाढली आणि परिणामी दर गडगडले. सध्या गावठी कोथिंबिरीची तब्बल ५८ हजार ७५० जुड्यांची आवक झाली असून, तिला सरासरी प्रतिशेकडा २,००० रुपये भाव मिळत आहे.
हायब्रीड कोथिंबिरीलाही केवळ १,५०० रुपयांचा भाव मिळत आहे. मेथी व शेपूची आवक चांगली झाल्याने त्यांचे दरही सुमारे १,८०० रुपयांवर स्थिरावले आहेत. विशेषतः कांदापातच्या दरात मोठी घसरण झाली असून, तिला प्रतिशेकडा केवळ १,००० रुपये भाव मिळत आहे. एकूणच, उत्पादन खर्च वाढलेला असताना बाजारभाव घसरल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.