नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती Pudhari News Network
नाशिक

Nashik APMC | नाशिक बाजार समिती सचिवांचे निलंबन

सभेच्या इतिवृत्तामध्ये फेरफार केल्याचा ठपका

पुढारी वृत्तसेवा

पंचवटी (नाशिक ) : नाशिक बाजार समितीमध्ये सचिव प्रकाश घोलप यांनी सभेच्या इतिवृत्तामध्ये फेरफार केल्याचा ठपका ठेवत संचालक मंडळाने घोलप यांना निलंबित केले असल्याची माहिती सभापती कल्पना चुंभळे यांनी दिली.

घोलप यांनी कामकाज करताना अनेक गंभीर गैरकृत्य, गैरप्रकार केले असून संचालक मंडळ सभेच्या इतिवृत्तामध्ये बाजार समितीचे विभाजन करण्याबाबत सभेवर नसलेल्या विषयाचा ठराव स्वतंत्र कागदान्वये चिटकविला, असा दावा संचालक मंडळाने केला आहे.

नाशिक बाजार समितीच्या कार्यालयात गुरुवारी (दि.०३) आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी उपसभापती विजय माळेकर, सविता तुंगार, सी.पी निकम, प्रल्हाद काकड आदी उपस्थित होते. घोलप यांनी कार्यालयीन जावक क्र. ९० दि.०२ मे २०२४ या जुन्या तारखेस जावक रजिस्टरला नोंदवला. हा प्रस्ताव पणन संचालकांना प्रत्यक्षात १० मार्च २०२५ रोजी प्राप्त झाल्याच्या पत्रामुळे हा प्रकार उघडकीस आला. बाजार समितीच्या कामकाजाच्या कागदपत्रांमध्ये अजुनही अशा प्रकारचे गैरप्रकार केल्याची शक्यता नाकारता येत नसल्याची शक्यता चुंभळे यांनी व्यक्त केली आहे.

स्वतंत्र आरोपपत्र देवून खातेनिहाय चौकशी करण्याचे बाजार समितीने ठरविले आहे. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले. दरम्यान सचिव पदाचा पदभार, सर्व कागदपत्रे तुर्त सहाय्यक सचिव निवृत्ती लहानु बागुल यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला आहे.

न्यायालयात जाणार: घोलप

दरम्यान, नाशिक, त्रंबक, पेठ तालुक्याची बाजार समितीचे विभाजन हा विषय अजेंड्यावरील नसून, तो ऐन वेळचा विषय होता. तत्कालीन सभापतींनी संचालक मंडळ यांच्याशी चर्चा करून त्याविषयी प्रोसिडिंग करायला सांगितली. त्यानुसार आपण नोंद घेतली आहे. याबाबत कोणतेही प्रकारची अफरातफर झाली नाही, असा दावा निलंबित सचिव प्रकाश घोलप यांनी केला आहे. या ठरावाबाबत शासनाकडून अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही. तत्कालीन संचालक मंडळ सदरचा ठराव हा रद्दबातल देखील करू शकतो. आपल्यावरील कारवाई ही सूडबुद्धीने झालेले असून पूर्णपणे चुकीची आहे. या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे घोलप यांनी सांगितले.

तत्कालीन सभापतींच्या कार्यकाळातील तीस वर्षाचा कारभार स्वच्छ करण्यास सुरुवात झाली आहे. आणखी गंभीर प्रकार समितीत असू शकतात. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहे. दोषींवर तत्काळ कारवाई करण्यात येईल.
-कल्पना चुंभळे, सभापती, नाशिक बाजार समिती, नाशिक.
तत्कालीन सभापतींच्या आदेशानुसारच इतिवृत्तात फेरफार झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच एक जरी पुरावा दिला तर राजकारणातून संन्यास घेईल असे तत्कालीन सभापती पिंगळे यांनी जाहीर केले होते. त्यानुसार आता त्यांनी तत्काळ घेऊन आपली भूमिका प्रत्यक्षात करून दाखवावी.
विनायक माळेकर, उपसभापती , नाशिक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT