नाशिक : विकास गामणे
जिल्ह्यातील अंगणवाड्या वीजजोडणीअभावी अंधारात असल्याचे वास्तव समोर आले आहे. जिल्ह्यात एकूण पाच हजार ११५ अंगणवाड्या आहेत. त्यापैकी तब्बल तीन हजार १५६ अंगणवाड्यांना वीजजोडणी झालेली नाही.
एक हजार ७१ अंगणवाड्यांना वीजजाेडणी असली, तरी त्यातील थकबाकीमुळे ६६ अंगणवाड्यांचा वीजपुरवठा खंडित झालेला आहे. बालकांचे भविष्य घडविणाऱ्या अंगणवाड्याच अंधारात आहेत.
राज्य शासनाने अंगणवाडी केंद्रांना वीजजोडणी देण्याचे आदेश काढल्यानंतर, जिल्ह्यातील वीजपुरवठा नसलेल्या अंगणवाडी केंद्रांचा अहवाल तयार केल्यानंतर उपरोक्त आकडेवारी समोर आली आहे. जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागांतर्गत जिल्हाभरात एकूण पाच हजार ११५ अंगणवाडी केंद्रे चालविली जातात. त्यातील चार हजार २५६ अंगणवाड्या स्वमालकीच्या इमारतीत सुरू असून, त्यातील ४०३ अंगणवाडी केंद्रांना वीज सुविधा उपलब्ध आहे, तर ६६८ अंगणवाड्यांना सौरऊर्जेच्या माध्यमातून वीज प्राप्त झालेली आहे. सद्यस्थितीत तीन हजार १५६ अंगणवाडी केंद्रांना विजेची प्रतीक्षा आहे. ३३२ अंगणवाडी केंद्रांना विद्युत मीटर जोडणी झाली असली, तरी त्यातील ६६ अंगणवाडी केंद्रांनी वीजबिले भरलेली नसल्याने त्यांची वीज तोडली आहे.
शासन आदेशानंतर ३५८ अंगणवाडी केंद्रांनी वीजजोडणीसाठी अर्ज केलेत. त्यातील ४६ केंद्रांना वीज मीटर जोडणी झालेली आहे. १०१ अंगणवाडी केंद्रांना वीजजोडणीसाठी वायर टाकणे शिल्लक आहे. १३७ केंद्रांनी जवळील अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत कार्यालयातून वीजजोडणी घेतली आहे. २७ केंद्रांवर सोलर पॅनल जोडणीचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे एकूण २०१ अंगणवाड्यांची वीज समस्या निकाली निघाली आहे.
दरम्यान, शासन आदेशानुसार अंगणवाडी केंद्रांच्या वीजजोडणीची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी यांना दिले आहेत. याबाबत समन्वय सभेत तसेच गटविकास अधिकारी यांच्या बैठकीत वीजजोडणीबाबतचा आढावा दोनदा घेतला गेला.
सीईओ आशिमा मित्तल यांच्या आदेशानुसार अंगणवाडी केंद्रांना वीजजोडणी करण्याचे काम सुरू आहे. दररोज बालविकास प्रकल्पाधिकारी यांच्याकडून आढावा घेतला जात आहे. ही कामे लवकरच पूर्ण होतील.प्रताप पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला बालकल्याण विभाग, नाशिक