जमीन वादातून वृद्धाला जिवंत जाळले pudhari photo
नाशिक

Nashik | जमीन वादातून वृद्धाला जिवंत जाळले

सख्खा भाऊ ठरला पक्का वैरी

पुढारी वृत्तसेवा

निफाड/लासलगाव : जमीन आणि विहिरीच्या वादातून सख्ख्याभावासह दोन पुतण्यांनी वृद्धाला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. ९) निफाड तालुक्यातील सारोळे थडी या गावात घडली. यात वृद्ध कचेश्वर महादू नागरे (७५) हे ९५ टक्के भाजल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी निफाड पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सारोळे थडी येथील नागरे बंधूंमध्ये वडिलोपार्जित जमीन व विहिरीवरून वाद असल्याने त्यावरून २०२२ मध्ये निफाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. मात्र समन्वय न साधला गेल्याने वाद विकोपाला पोहोचला. कचेश्वर नागरे हे मंगळवारी सकाळी १०.३०च्या सुमारास नांदूरमध्यमेश्वर शिवारातील आपल्या शेतातील घरासमोर साफसफाई करत असताना त्यांचे धाकटे बंधू संशयित चांगदेव हे रवींद्र व नीलेश या मुलांसमवेत तेथे आले. घराबाहेर कुणीच नसल्याची संधी साधत कचेश्वर यांच्या अंगावर डिझेल टाकून पेटवून देत पोबारा केला. काही समजण्याच्या आतच हा प्रकार घडला. आगीच्या ज्वालांनी वेढलेले कचेश्वर हे मदतीसाठी सैरभैर धावले. त्यांचा आरडाओरडा ऐकून कुटुंबीय घराबाहेर आले असता समोरील चित्र पाहून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी आग शमवत कचेश्वर यांना तत्काळ निफाड शासकीय रुग्णालयात आणले. येथे प्राथमिक उपचार होऊन त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात वर्ग करण्यात आले. मात्र, ९५ टक्के भाजले असल्याने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या सूनेच्या फिर्यादीवरून संशयितांविरोधात प्रथम खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला. नंतर ३०२ हे कलम लावण्यात आले.

संशयित फरार

घटनेनंतर संशयित संपूर्ण नागरे कुटुंबीय परागंदा झाले आहे. पोलिस उपअधीक्षक नीलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक ईश्वर पाटील हे अधिक तपास करत असून, आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत.

--

तणावपूर्ण वातावरणात अंत्यविधी

फरार तीनही आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत अंत्यविधी न करण्याची भूमिका आप्तांनी घेतली होती. या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण असल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. पोलिस उपअधीक्षक पालवे यांनी नातेवाइकांची समजूत काढल्यानंतर बुधवारी (दि. १०) कचेश्वर यांच्या पार्थिवावर अंत्यविधी पार पडले.

..अन‌् घात झाला

या घटनेबाबत कचेश्वर यांचा मुलगा प्रा. संजय यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, कचेश्वर व त्यांचे बंधू चांगदेव हे शेजारी - शेजारीच राहतात. सात-आठ वर्षांपासून नांदूरमध्यमेश्वर शिवारातील शेतीतील विहिरीवरून उभयतांमध्ये वाद सुरू होता. वडील कचेश्वर आणि आई जिजाबाई वयोवृद्ध असून, ते एकटेच राहत होते. माझा भाऊ हनुमंत शेजारीच राहतो. परंतु, घटनेपूर्वी तो कामानिमित्त बाहेर गेला होता. ही संधी साधत काका व त्यांच्या मुलांनी घात केल्याचे संजय यांचे म्हणणे आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT