नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
हळदीच्या कार्यक्रमात धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एकावर कोयत्याने वार करून त्याचे बोट छाटल्याची धक्कादायक घटना अमृतधाम परिसरातील विडी कामगारनगर येथे घडली. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, सर्व संशयितांना अटक झाली आहे.
अमोल सोमनाथ जगळे (३५, रा. विडी कामगारनगर, अमृतधाम) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवारी (दि. १४) सुमारे ९.४५ वाजता ते मामेभावाच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी विडी कामगारनगर येथे गेले होते.
यावेळी कार्यक्रमात नाचताना संशयित सिद्धांत ऊर्फ भुऱ्या वंजारी याला धक्का लागल्याने जगळे यांनी त्याला व्यवस्थित नाचण्यास सांगितले. याचा राग आल्याने वंजारीने त्याचे मित्र पीयूष खाडे, चिराग गजबे आणि नितीन मारकड यांना बोलावून घेतले. त्यानंतर चौघांनी मिळून जगळे यांना शिवीगाळ करून मारहाण केली.
त्यात नितीन मारकडने फिर्यादीला मागून पकडून ठेवले आणि सिद्धांत ऊर्फ भुऱ्या वंजारी याने कंबरेला असलेला लोखंडी कोयता काढून डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. जीव वाचवण्यासाठी जगळे यांनी हात वर केल्याने कोयत्याचा वार त्यांच्या उजव्या हाताच्या तर्जनीवर बसला.
यात त्यांच्या बोटाचा नखाखालचा भाग छाटला जाऊन ते गंभीर जखमी झाले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी काही तासांतच चारही आरोपींना अटक केली असून, सोमवारी (दि. १६) त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक कुवर अधिक तपास करीत आहेत