Nashik Ambad industrial area
सिडको : अवैध बांधकामाची खोटी तक्रार दाखल करून ती मागे घेण्यासाठी उद्योजकाला धमकावत ३ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या खंडणीखोर संतोष शर्मा याच्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शर्मा याच्या विरोधातील खंडणीचा हा पाचवा गुन्हा असल्याचे पोलिसांनी सांगितले.
फिर्यादी निखिल राऊत (वय ५१, रा. एमजी रोड, कांदिवली पश्चिम) यांची अंबड औद्योगिक वसाहती परिसरात कंपनी आहे. या कंपनीत अवैध बांधकाम केल्याचा बनवाबनवी आरोप करत संशयित संतोष शर्मा याने एमआयडीसी कार्यालयात त्यांच्या विरोधात खोटी तक्रार दाखल केली. तक्रार मागे घेण्यासाठी त्याने राऊत यांना धमकावत दीड लाख रुपये उकळले, अशी माहिती फिर्यादीने दिली.
यावरच समाधान न मानता, ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी माऊली लॉन्स येथे भेटीस बोलावत शर्मा यांनी पुन्हा दडपण आणले. “आणखी दीड लाख रुपये द्या, नाही तर तुमच्या जिवाचं काही खरं नाही,” अशी जिवे मारण्याची धमकी देत त्याने आणखी दीड लाख रुपये घेतले. एकूण तीन लाखांची खंडणी शर्मा याने जबरदस्तीने वसूल केल्याचे फिर्यादीने पोलीस तक्रारीत नमूद केले आहे.
या प्रकरणी फिर्यादी निखील राऊत यांच्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात संतोष शर्मा याच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चुंचाळे पोलीस चौकीचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष नरूटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप भंडे अधिक तपास करीत आहेत.