Dengue
डेंग्यू प्राणघातक आहे Pudhari News Network
नाशिक

Nashik Alert | डेंग्यू निर्मूलनासाठी महापालिका ॲक्शन मोडवर

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढल्याने महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्त स्मिता झगडे ॲक्शन मोडवर आल्या असून डास निमूर्लन मोहिमेसाठी आता ५०० कर्मचाऱ्यांची पथके तयार करण्यात आली आहेत. यात पेस्ट कंट्रोलच्या ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांसह २०० आशा सेविकांचाही समावेश करण्यात आला असून कोरोनाच्या धर्तीवर घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी केली जाणार आहे.

नाशिक महापालिका ॲक्शन मोडवर असून सर्वत्र डास निमूर्लन मोहिमेसाठी पेस्ट कंट्रोल ठेकेदाराकडील २०० कर्मचाऱ्यांसह २०० आशा वर्कर यांना प्रभागनिहाय घरभेटीचे टार्गेट दिले आहे. साधारण एका पथकामार्फत रोज तीस घरांची तपासणी अपेक्षित आहे.

जून महिन्यात डेंग्यू बाधितांचा आकडा १५५ व गेल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यातच ९६ जणांना या आजाराची लागण झाल्याने नाशिक शहरात या आजाराचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसत आहे. केंद्र शासनाच्या पथकाने महापालिकेची झाडझडती घेत डेंगू नियंत्रणासाठी ॲक्शन प्लॅन राबवण्याचे निर्देश दिले होते. मात्र त्यानंतरही डेंग्यू रुग्णसंख्या वाढत असल्याने अतिरिक्त आयुक्त झगडे यांनी विशेष बैठक घेत पुढील पंधरा दिवसात डेंगू नियंत्रणासाठी कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार पेस्ट कंट्रोल ठेकेदाराकडील २०० कर्मचाऱ्यांसह २०० आशा वर्कर यांना प्रभागनिहाय घरभेटीचे टार्गेट दिले आहे. साधारण एका पथकामार्फत रोज तीस घरांची तपासणी अपेक्षित आहे. साधारणपणे एक मलेरिया कर्मचारी व एक आशा वर्कर असे दोन जणांचे पथक असेल. या पथकाला घरामधील डेंगूची उत्पत्ती स्थळ, परिसरातील पाण्याची डबकी, त्याला कारणीभूत असणाऱ्या लोकांचे प्रबोधन करणे, दंडात्मक कारवाई करणे अशी जबाबदारी दिली जाणार आहे.

कोरोनाच्या धर्तीवर डेंग्यू बाधितांचा शोध

कोरोनाच्या धर्तीवर डेंग्यू बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतला जाणार आहे. यासाठी मलेरिया विभागाच्या ५० कर्मचाऱ्यांना ३६५ बाधित रुग्णांच्या संपर्कांमधील प्रत्येक व्यक्तीच्या ट्रेसिंगची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. डेंग्यूचा रुग्ण आढळलेल्या परिसरात औषध व धूर फवारणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जाणार आहेत.

ब्लॅक स्पॉटमुक्तीसाठी मोहिम

डेंग्यू निर्मूलनासाठी डासांची उत्पत्तीस्थाने असलेल्या ब्लॅक स्पॉटच्या मुक्तीची मोहिम हाती घेण्यात आली आहे. विभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत ब्लॅक स्पॉट शोधून ती नष्ट केली जाणार आहेत. मोठे बांधकाम प्रकल्प, तळघरे, रस्त्यांवर पडलेले खड्डे किंवा अन्य डास उत्पत्ती स्थळांवर मलेरिया विभागाचे कर्मचारी जाऊन कारवाई करतील. सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना देखील आता या मोहिमेमध्ये सहभागी करून घेतले जाणार आहे.

पुढील पंधरा दिवसांमध्ये डेंगू नियंत्रणासाठी युद्ध पातळीवर मोहिम हाती घेतली जाणार आहे. ५०० कर्मचाऱ्यांची पथके शहरांमध्ये फिरून त्यासाठी प्रयत्न करणार आहे. माझ्या स्वतःबरोबर, सर्व खाते प्रमुख, विभागीय अधिकाऱ्यांचे मोहिमेवर लक्ष असेल.
स्मिता झगडे, अतिरिक्त आयुक्त, नाशिक महापालिका.
SCROLL FOR NEXT