ओझर विमानतळावरून सुरू असलेल्या हवाई सेवेला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. file
नाशिक

Nashik Airport | नाशिकच्या हवाई प्रवासाचे 'टेक ऑफ'

वर्षभरात प्रवासीसंख्या पाऊण लाखाने वाढली, नोव्हेंबरमध्ये ३४ हजार प्रवाशांचे उड्डाण

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : ओझर विमानतळावरून सुरू असलेल्या हवाई सेवेला जोरदार प्रतिसाद मिळत असून, २०२४ या वर्षात तब्बल तीन लाख एक हजार ९०८ प्रवाशांनी प्रवास केला आहे. २०२३ मध्ये ही संख्या दोन लाख २५ हजार ११९ इतकी होती. २०२४ मध्ये त्यात ७६ हजार ७८९ ने वाढ झाली आहे. नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक ३४ हजार २३६ प्रवाशांनी हवाई सेवेचा लाभ घेतला. प्रवाशांच्या प्रतिसादामुळे नाशिकच्या हवाई सेवेने 'टेक ऑफ' घेतल्याची चर्चा आहे.

२०२२ मध्ये एकापाठोपाठ एका कंपनीने नाशिकहून दिली जाणारी सेवा बंद केल्याने, नाशिकची विमानसेवा संकटात सापडली होती. इंडिगो कंपनीने सेवा सुरू करीत, नाशिकच्या हवाई सेवेला बूस्ट देण्याचा प्रयत्न केला. त्यास प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने, दरवर्षी प्रवासीसंख्येचे विक्रम नोंदविले जात आहेत. २०२३ मध्ये दर महिन्याला १८ हजार ७६० प्रवाशांनी प्रवास केला. हाच आकडा सन २०२४ मध्ये २५ हजार १५९ वर पोहोचला. सन २०२४ मध्ये नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक ३४ हजार २३६ जणांनी, तर एप्रिलमध्ये सर्वांत कमी १५ हजार ६४९ जणांनी प्रवास केला.

दरम्यान, ओझर विमानतळावरून सध्या नवी दिल्ली, बेंगळुरू, अहमदाबाद, नागपूर, गोवा, लखनऊ, इंदूर, हैदराबाद या ठिकाणांसाठी सेवा सुरू आहे. तेथून देशातील अनेक महत्त्वाच्या शहरांसाठी व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेवाही उपलब्ध आहेत. गतवर्षात नाशिक येथून नवी दिल्ली, बेंगळुरू, जयपूर व लखनऊ विमानसेवा सुरू झाल्याने प्रवासीसंख्येत वाढ झाली आहे.

...तर एक लाखांपर्यंत प्रवासीसंख्या

गेल्या वर्षभरात अहमदाबाद, इंदूर, गोवा, जयपूर या विमानसेवांमध्ये अंशत: कपात करण्यात आली. याशिवाय डिसेंबरमध्ये काही दिवस धुके व अन्य तांत्रिक कारणांमुळे नवी दिल्ली सेवा बंद होती. त्यामुळे प्रवासीसंख्येत काहीशी घट झाली. अन्यथा गतवर्षीच्या तुलनेत सन २०२४ मधील प्रवाशांची वाढ एक लाखापर्यंत पोहोचली असती, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.

२०२५ मध्ये कोलकाता, चेन्नई सेवा

नवीन वर्षात कोलकाता, चेन्नईसाठी सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय देशातील अन्य महत्त्वाची शहरे नाशिकशी जोडली जाण्याची शक्यता आहे. नाशिकहून थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवेबाबतही चाचपणी सुरू आहे. तसेच गेल्या महिन्यात खंडित झालेली जयपूर विमानसेवाही पुढील महिन्यापासून पूर्ववत केली जाणार आहे.

नाशिक विमानतळावरून हवाई सेवेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांची संख्या समाधानकारक असून, पुढील काळात त्यात आणखी वाढ होईल. २०२५ या वर्षात अन्य विमान कंपन्यांकडून सेवा सुरू केली जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास नाशिककरांना आणखी पर्याय उपलब्ध होतील. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
मनीष रावल, अध्यक्ष, एव्हिएशन कमिटी, निमा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT