सतीश डोंगरे
नाशिक : अल्पावधीत प्रवासी संख्येचा विक्रम नोंदविणाऱ्या ओझर येथील नाशिक विमानतळाचा कायापालट जानेवारी २०२७ पर्यंत करण्यात येणार आहे. त्यासाठी ४३८ कोटी १८ लाख रुपयांची निविदा प्रक्रियादेखील पूर्ण करण्यात आली आहे. दोन सुसज्ज टर्मिनल इमारतींसह अनेक अत्याधुनिक सुविधा उभारण्यात येणार आहेत. आगामी सिंहस्थ, कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांच्या संख्येचा विचार करीत नाशिक विमानतळाला झळाळी देण्यात येणार आहे. रविवारी (दि. ८) या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
ओझर येथील नाशिक विमानतळ येथून २०१७ पासून नियमित प्रवासीसेवा सुरू करण्यात आली. प्रारंभी चार एअरलाइन्स कंपन्यांनी सेवा सुरू केली होती. मात्र, सद्य:स्थितीत केवळ इंडिगो या एअरलाइन्स कंपनीकडून सेवा दिली जात आहे. त्यास प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. २०२४-२५ या वर्षात विक्रमी ३ लाख ४० हजार प्रवाशांची नोंद झाली. आगामी सिंहस्थात हा आकडा अधिक वाढणार असल्यामुळे विमानतळाचा मेकओव्हर केला जाणार आहे. दरम्यान, विस्तारीकरणानंतर ओझर विमानतळाची प्रवासी हाताळणी क्षमतेत चार पटीने वाढ होणार आहे. सद्य:स्थितीत ताशी ३०० प्रवाशांची हाताळणी केली जाते. मात्र, विस्तारीकरणानंतर हा आकडा थेट एक हजारापर्यंत पोहोचणार आहे.
दोन सुसज्ज टर्मिनल इमारती उभारणार
१७ हजार ८०० चौ. मी. क्षेत्रफळावर उभारणार टर्मिनल
१७ विमानांसाठी प्रशस्त पार्किंग सुविधा
१ लाख १५ हजार २२० चौ. मी. क्षेत्रात नवीन ॲप्रॉन
शासकीय विमाने व हेलिकॉप्टरसाठी मोफत पार्किंग
२५ हजार चौ. मी. क्षेत्रात वाहनतळाची सुविधा
प्रवासी बोर्डिंग सुविधा, एरो ब्रिज, सुरक्षा स्कॅनर आदी सुविधा
ताशी एक हजार प्रवाशांची हाताळणी करणे होणार शक्य
महाराष्ट्र सुविधा विकास मंडळातर्फे नव्या टर्मिनल इमारतीचे बांधकाम व विस्तारीकरण कामाचे भूमिपूजन रविवारी (दि. ८) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ओझर विमानतळ येथे सायंकाळी ५ वाजता हा भूमिपूजन सोहळा होईल. या सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंह भोसले, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आ. सुहास कांदे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित उपस्थित असणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, एचएएलचे अधिकारी साकेत चतुर्वेदी, मुख्य अभियंता रणजित हाडे यांनी दिली आहे.