नाशिक विमानसेवेचे पंख विस्तारले file photo
नाशिक

Nashik Airlines | नाशिक विमानसेवेचे पंख विस्तारले

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : ओझर येथील विमानतळावरून येत्या १० सप्टेंबरपासून नाशिक-बेंगळुरू विमानसेवा सुरू होत असून व्हाया सिंगापूर, बाली, श्रीलंका, थायलंड या देशांत कमी वेळेत नाशिककरांना जाणे शक्य होणार आहे. दरम्यान, या सेवेच्या माध्यमातून नाशिकचा आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडले जाणार असल्याने, नाशिककरांकडून त्याचे स्वागत केले जात आहे.

ओझर विमानतळावरून सध्या 'इंडिगो'ची नवी दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, इंदूर, गोवा व नागपूर या ठिकाणांसाठी सेवा सुरू असून, १० सप्टेंबरपासून बेंगळुरू सेवेला प्रारंभ केला जाणार आहे. दररोज सायंकाळी ४.५० वाजता हे विमान नाशिक येथून उड्डाण घेणार आहे. त्याचे बुकिंग सुरू झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर कंपनीने नवे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार बेंगळुरू विमानामुळे नाशिकला काही नवे देश जोडले जाणार आहेत. त्यात सिंगापूर, बाली, श्रीलंका, थायलंड यांचा समावेश आहे. याशिवाय नाशिक ते नवी दिल्ली व हैदराबाद या विमानांनाही कंपनीने आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून दिली असून, त्यामुळे नाशिककर अबुधाबी, दुबई, हाँगकाँग, काठमांडू, कुवेत, लंडन, न्यूयॉर्क, पर्थ, पॅरिस, रोम, शारजा, सिडनी, व्हिएन्ना, झुरीच ही शहरे 'हॉपिंग फ्लाइट'द्वारे गाठू शकणार आहेत. संबंधित ठिकाणी प्रवाशांना काही तासांची प्रतीक्षा करावी लागणार असली, तरी या शहरांना हवाईमार्गे जाण्यासाठी सध्या नाशिककरांना मुंबई गाठावी लागते. त्यात सुमारे सहा ते आठ तासांचा वेळ जातो. त्याऐवजी कनेक्टिंग फ्लाइट्सचा पर्याय स्वगातार्ह असल्याचे मत नाशिककरांकडून व्यक्त केले जात आहे.

या देशांना नाशिकचा कनेक्ट

नाशिक - बाली (सायं. ४.५० ते रात्री १०.२०), नाशिक – बँकॉक (सायं. ४.५० ते रात्री ११.२०), नाशिक – कोलंबो (सायं. ४.५० ते रात्री १२.५५), कोलंबो – नाशिक (सकाळी ७.३० ते ४.२०), नाशिक – सिंगापूर (सायं. ४.५० ते पहाटे ४.३०)

बेंगळुरू विमानाच्या वेळा अशा...

बेंगळुरू – नाशिक : दुपारी २.३० ते सायं. ४.२०

नाशिक - बेंगळुरू : सायं. ४.५० ते ६.३५

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT