Nashik Airlines pudhari file photo
नाशिक

Nashik Airlines | विमानसेवेची आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी वाढली

38 वरून 70 शहरे कनेक्ट : तिरुपती अवघ्या चार तासात

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : नाशिकच्या ओझर विमानतळावरून सेवा देत असलेल्या इंडिगो एअरलाइन्स कंपनीने देश, विदेशातील शहरांना जोडणाऱ्या विमानसेवेचे उन्हाळी वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यात आंतरराष्ट्रीय शहरांच्या कनेक्टिव्हिटीमध्ये वाढ झाली असून, हा आकडा आता ३८ वरून ७० वर पोहोचला आहे. तसेच नाशिककरांना अवघ्या चारच तासांत तिरुपती गाठणे शक्य होणार आहे.

ओझर विमानतळावरून सध्या इंडिगोकडून दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू, अहमदाबाद, इंदूर, गोवा याठिकाणी नियमित विमानसेवा दिली जात आहे. नाशिक-नागपूर ही विमानसेवा सुरू होती. मात्र, नागपुरमधील विमानतळाचे काम सुरू असल्याने ही सेवा तूर्त बंद केली आहे. दरम्यान, या शहरांना जोडणाऱ्या विमानसेवेचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर आता हॉपिंग फ्लाइटने देश-विदेशातील शहरांना जोडणाऱ्या विमानसेवेचे कंपनीच्या वतीने वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ३० मार्च ते २५ आॅक्टोबरपर्यंत हे वेळापत्रक लागू असेल. या वेळापत्रकानुसार नवी दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, बंगळुरू या विमानतळांवरून बेळगाव, चंडीगढ, दरभंगा, कोझीकोड, डेहराडून, जबलपूर, गया, पंचनगर, विजयवाडा, विशाखापट्टणम, मदुराई आदी शहरांसाठी 'कनेक्टिंग' विमानसेवेचा लाभ नाशिककरांना घेता येणार आहे.

काही वेळा विमान बदलून तर काही वेळा विमान न बदलता संबंधित शहर गाठता येणार आहे. विशेषत: धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले तिरुपती शहर आता नाशिकहून अवघ्या चार तासांत गाठता येणार आहे. नाशिक येथून दररोज दुपारी १२.२५ वाजता विमानाचे उड्डाण होणार असून ते व्हाया हैदराबाद दुपारी ४.१० वाजता तिरुपतीला पोहोचणार आहे. दुपारी ११.५५ वाजता विमान परतीला निघणार असून ते सायंकाळी ४.५० वाजता नाशिकला पोहोचेल.

बोस्टन, इस्तांबूल, ताश्कंद शहरांना जोडणारी सेवा

सुमारे ७० आंतरराष्ट्रीय शहरांनाही नाशिकला जोडण्यात आले आहे. यापूर्वी नाशिकमधून ३८ आंतरराष्ट्रीय शहरांसाठी कनेक्टिंग फ्लाइट उपलब्ध होत्या. ही संख्या आता जवळपास दुप्पटीने वाढली आहे. नव्याने जोडल्या गेलेल्या आंतरराष्ट्रीय शहरांत बहरीन, बोस्टन, इस्तांबूल, ताश्कंद आदी शहरांचा समावेश आहे.

नाशिक येथून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय शहरांसाठीच्या विमानसेवेत वाढ होत आहे, ही चांगली बाब आहे. आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून आणखी शहरे थेटपणे जोडण्याचा प्रयत्न राहणार आहे.
मनीष रावल, अध्यक्ष, एव्हीएशन कमिटी, निमा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT