Nashik Agriculture
मका पिकावर पडलेल्या अमेरिकन लष्करी अळीमुळे मोठे नुकसान होत आहे. (छाया : निलेश शिंपी)
नाशिक

Nashik Agriculture News | लष्करी अळीमुळे शेतकरी संकटात

पुढारी वृत्तसेवा

मालेगाव : तालुक्यात महिना - दीड महिन्यापूर्वी पेरणी केलेल्या खरिपातील पिकांना गत पंधरवडयात झालेल्या पावसाने तारले आहे, तर दुसरीकडे मका पिकावर पडलेल्या अमेरिकन लष्करी अळीने मारले आहे. असे म्हणण्याची वेळ मका उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे. अमेरिकन लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे मका उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. (American army worms are eating corn)

मृग व रोहिणी नक्षत्रांत झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी खरिपातील बाजरी, मका, तूर, कपाशीची लागवड केली. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहात होते. पंधरवड्याच्या विश्रांतीनंतर पावसाचे पुनारागमन झाले. त्यामुळे खरिपातील पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र मका पीक अमेरिकेन लष्करी आळीच्या हल्ल्यात नेस्तनाबूत होत असल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहे. कृषी विभागाने नियंत्रणासह जनजागृतीसाठी कंबर कसली आहे.

तालुक्यातील शेतकरी चार - पाच वर्षांपासून अस्मानी व सुलतानी संकटांचा सामना करीत आहे. अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळासारख्या नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. कांद्याला बाजारभाव मिळाला नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले. त्यानंतरही नव्या उमेदीने बळीराजा हंगामासाठी सज्ज झाला. हवामान खात्याने यावर्षी समाधानकारक पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाचे नियोजन केले. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार सुरुवात केली.

मालेगाव : मका पिकात तणनाशक फवारणी करताना शेतकरी.

तालुक्यात ३८ हजार ८५० हेक्टर क्षेत्रावर मका पीक लागवडीचे उद्दिष्ट कृषी विभागाने ठेवले होते. प्रत्यक्षात ४२ हजार २१० हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची लागवड झाली आहे. मका हे हमखास पैसे देणारे पीक म्हणून ओळखले जाते. त्यामुळे मका पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत असला, तरी शेतकरी मका लागवडीकडे आकर्षित होत आहेत. सन २०१८ च्या खरीप हंगामात कर्नाटक राज्यात मकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळला होता. त्यानंतर नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी लष्करी अळी आढळून आली होती. त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. मकावरील लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी शेतकरी अनेक महागड्या औषधांची फवारणी करीत पीक वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. आधीच शेती उत्पादित मालाला बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त असतानाच मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. (American army worms)

कृषी विभागामार्फत लष्करी अळी नियंत्रणासाठी उपाययोजना

मालेगाव तालुक्यातील टाकळी, नांदगाव व सौंदाणे परिसरात १०० टक्के मका पेरणी झाली आहे. या भागात मका पिकावर लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळला आहे. लष्करी अळीचा वाढता प्रादुर्भाव पाहता मालेगाव कृषी विभागामार्फत लष्करी अळी नियंत्रणासाठी विविध उपाययोजना अवलंबिल्या जात आहेत. (army worms)

तालुका कृषी अधिकारी भगवान गोर्डे, वडेल कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ विशाल चौधरी, सौंदाणे मंडळ कृषी अधिकारी आर. के. अहिरे, कृषी सहायक मच्छिंद्र साळुंखे यांनी टाकळी येथील शेतकरी महेंद्र अहिरे यांच्या शेताला भेट देऊन मका पिकाची पाहणी केली. तसेच परिसरातील शेतकल्यांची गाव बैठक घेऊन उपस्थित शेतकऱ्यांना लष्करी अळी नियंत्रणाबाबत मार्गदर्शन केले. चौधरी यांनी शेतकऱ्यांना लष्करी अळीच्या विविध अवस्था व जीवनचक्र समजावून सांगितले. तसेच लष्करी अळीचे एकात्मिक नियंत्रण करण्याबाबतचे मार्गदर्शन केले. गोर्डे यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेची मुदत वाढली असून, अधिकाधिक शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा यासाठी आवाहन केले, तसेच महाडीबीटीवर शेतकयांनी कृषी विभागासाठी विविध योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले. अहिरे यांनी कृषी संदर्भात विविध निविष्ठा खरेदी करतानाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. साळुंखे यांनी मका पीकवाढ अवस्थेत मका पिकामध्ये पक्षी थांबे बसविणे याबाबत प्रात्यक्षिक दाखवत मार्गदर्शन केले.

टाकळी : येथील मका पिकाची पाहणी करताना भगवान गोडे, शास्त्रज्ञ विशाल चौधरी, आर. के. अहिरे, मच्छिंद्र साळुंखे आदी.

तणनाशक फवारणी

पावसाळ्याच्या एक-दीड महिन्याच्या कालावधीत झालेल्या एक दोन पावसांवर खरिपातील पिके तग धरून उभी आहेत. त्यामुळे शेतशिवार हिरवेगार झाले आहे. ही पिके एक ते दीड महिन्याची झाली आहेत. खरिपातील पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात तण उगवले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांकडून निंदणी, खुरपणी, कोळपणी आदी कामे केली जात आहेत, तर अनेक शेतकऱ्यांकडून निंदणीऐवजी मका पिकावर तणनाशक मारणे पसंत केले जात आहे.

SCROLL FOR NEXT