मालेगाव : काष्टी येथील छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल लोकार्पणप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भ्रमणध्वनीवरून भाषण ऐकविताना पालकमंत्री दादा भुसे.  (छाया : नीलेश शिंपी)
नाशिक

नाशिक : काष्टीचे कृषी विज्ञान संकुल उत्तर महाराष्ट्रासाठी वरदान | CM Eknath Shinde

CM Eknath Shinde: छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल लोकार्पण

पुढारी वृत्तसेवा

मालेगाव : तालुक्यातील काष्टी येथे एकाच वेळी, एकाच ठिकाणी पाच कृषी महाविद्यालये सुरू करण्याचा विक्रम पालकमंत्री दादा भुसे (Nashik Guardian Minister Dada Bhuse) यांनी केला आहे. या छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसह शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. हे संकुल खर्‍या अर्थाने उत्तर महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी वरदान ठरेल, असा विश्‍वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केला.

काष्टी येथे राहुरी कृषी विद्यापीठअंतर्गत साकार होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी (दि. ४) पार पडला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी भ्रमणध्वनीवरून जनतेशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री भुसे, माजी मंत्री बबनराव घोलप, खासदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार किशोर दराडे, दिलीप बोरसे, विजय करंजकर, अजय बोरस्ते, मधुकर हिरे, सुरेश निकम, संजय दुसाने आदींसह मान्यवर उपस्थित होते.

दहा जिल्ह्यांत कार्यक्षेत्र विस्तारलेल्या राहुरी कृषी विद्यापीठाचे विभाजन होणे गरजेचे असल्याचे एका समितीच्या अहवालात नमूद होते. त्यानुसार नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांसाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठ मालेगावमध्ये निर्माण करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे ठेवला होता. परंतु त्याला यश मिळाले नसल्याचे सांगून मंत्री भुसे म्हणाले, सौंदाणे येथील कृषितज्ज्ञ प्रकाश पवार यांनी कृषी विज्ञान संकुलाची संकल्पना मांडली. त्यानुसार एकाच ठिकाणी पाच कृषी महाविद्यालये उभारण्याचा प्रस्ताव शासनापुढे मांडला आणि त्याला मान्यता मिळाली. शेती महामंडळाच्या ६५० एकर जागेवर हे कृषी विज्ञान संकुल साकार होत आहे. असा हा भारतातील पहिलाच प्रकल्प असावा. या कृषी महाविद्यालयात पंधराशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेणार आहेत. शेतकर्‍यांसह सगळ्यांनाच याचा लाभ होणार असल्याने त्यातून मालेगावात कृषी पंढरी अवतरत असल्याचे मंत्री भुसे म्हणाले.

मंजुरी मिळालेला नार-पार प्रकल्प त्वरित मार्गी लावण्यासह तालुक्यातील शेतकर्‍यांना थकीत पीकविमा रक्कम मिळावी, मांजरपाडा दोन प्रकल्पाला मंजुरी मिळावी, मालेगाव जिल्हानिर्मिती, या मागण्या यावेळी पालकमंत्र्यांनी मांडल्या. भाजप जिल्हाध्यक्ष प्रा. नीलेश कचवे, 'आरपीआय'चे जिल्हाध्यक्ष भारत जगताप, जितू करंजकर, राहुरी विद्यापीठाचे प्रशांतकुमार पाटील यांची भाषणे झाली.

.. अन‌् मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द

पालकमंत्री भुसे यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कृषी विज्ञान संकुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व कृषिमंत्री यांच्या उपस्थितीत आयोजिले होते. मात्र, मुंबई मंत्रालयात आमदार नरहरी झिरवाळ यांनी आंदोलन केल्याने मुख्यमंत्र्यांचा नियोजित दौरा प्रभावित झाला. दरम्यान, सायंकाळी पाचच्या सुमारास मालेगावात मुसळधार पाऊस सुरू झाला. हवामान बदलल्यामुळे हॅलिकॉप्टर उतरू शकत नाही. त्यामुळे इच्छा असूनही कार्यक्रमाला येता आले नसल्याची दिलगिरी मुख्यमंत्र्यांनी भ्रमणध्वनीवरून व्यक्त केली. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येईल, तेव्हा लवकरच मालेगावकरांच्या भेटीला येईल, असे आश्‍वासनही त्यांनी दिले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT