नाशिक : आडगाव येथील भूसंपादन प्रकरणात जागा मालकास वाढीव मोबदला अदा न केल्याने महापालिकेला न्यायालयाने दणका दिला आहे. महापालिकेचे बँक खाते सील करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. गुरुवारी झालेल्या महासभेत भूसंपादनासंदर्भातील प्रश्नावरील चर्चेदरम्यान महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी ही माहिती सभागृहाला दिली.
आडगाव येथील गट क्रमांक ७७२/१/२/४ आणि ७७२/१/२/५ या दोन जागा, प्रत्येकी ४९० चौ. मी. क्षेत्रफळाच्या महापालिकेने भूसंपादित केल्या होत्या. त्यासाठी जमीनमालकाला आधीच २०.४० कोटी रुपयांचा मोबदला देण्यात आला होता. मात्र जमीनमालक राजेंद्र जाधव यांनी वाढीव मोबदल्यासाठी जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला होता.
न्यायालयाने त्यांच्या बाजूने वाढीव मोबदला देण्याचा आदेश दिला. या आदेशाविरोधात महापालिकेने उच्च न्यायालयात अपील करणे अपेक्षित होते, परंतु महापालिकेने ते केले नाही आणि वाढीव रक्कमही अदा केली नाही. त्यामुळे जाधव यांनी न्यायालयात हुकूमनाम्याच्या अंमलबजावणीसाठी दरखास्त दाखल केली होती.
दरम्यान, वाढीव १८ कोटी रुपयांचा मोबदला मंजूर करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला होता, मात्र स्थायी समितीने तो प्रस्ताव फेटाळून थेट उच्च न्यायालयात अपील करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. गेल्या महिन्यात झालेल्या सुनावणीत आयुक्त खत्री यांच्याविरोधात जारी केलेले अटक वॉरंट न्यायालयाने तात्पुरते स्थगित करत न्यायालयाच्या निर्देशांच्या अंमलबजावणीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश महापालिकेला दिले होते. मात्र या निर्देशांचे विहित कालावधीत महापालिकेकडून पालन झाले नसल्यामुळे महापालिकेचे बँक खाते गोठवण्याचे निर्देश न्यायालयाने गुरुवारी (दि. २०) दिल्याची माहिती आयुक्तांनी सभागृहाला दिली.
पुनर्विचाराची मनपाची मागणी
न्यायालयात गुरुवारी (दि.२०) झालेल्या सुनावणीत महापालिकेच्या आयुक्तांना उपस्थित राहण्याचे निर्देश होते. परंतु, महासभा असल्याने पालिकेच्या वतीने सहायक संचालक दिव्यांक सोनवणे आणि मिळकत विभागाचे अभियंता जयवंत राऊत यांनी हजर राहत वकिलामार्फत महापालिकेची बाजू मांडली. वाढीव मोबदल्यासाठी पुनर्विचार प्रस्ताव दाखल करण्याचे तसेच उच्च न्यायालयातही अपील करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली. परंतु, न्यायालयाने आक्रमक पवित्रा घेत, थेट बँक खातेच सील करण्याचे निर्देश दिले. सोबतच बँक खात्यातून सदरची रक्कम वळती का करू नये, अशी विचारणादेखील केल्याचे समजते